Angar Nagar Panchayat : राजन पाटलांना माफ करणार नाही, उमेश पाटलांचा इशारा, अर्ज बाद झाल्यानंतर उज्वला थिटे न्यायालयात दाखल
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवरुन (Angar Nagar Panchayat) राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
Solapur Angar Nagar Panchayat News : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवरुन (Angar Nagar Panchayat) राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या नगरपंचायतीच्या 17 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, नगराध्यपदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका उज्वला थिटे यांनी घेतली आहे. उज्वला थिटे अपील दाखल करण्यासाठी सोलापूर न्यायालयात दाखल झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे देखील त्याच्यासोबत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं अनगर हे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. इथली नगरपंचायतीची निवडणूक, भाजप आमदार राजन पाटील यांचं राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांचे आरोप अशा अनेक घटनांमुळे अनगरची चर्चा सुरू आहे.
न्यायालयात सर्व गोष्टींची चिरफाड होईल, त्रुटींची नोटीस ई-मेल किंवा फोनवर का कळवलं नाही? उमेश पाटलांचा सवाल
निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेत त्या विरोधात आम्ही कोर्टात अपील करण्यासाठी आलो असल्याचे मत उमेश पाटील यांनी व्यक्त केले. मोहोळचे तहसीलदार हे आम्हाला मूर्ख समजतात का? असा सवाल देखील त्यांनी केलाय. Ak47 देऊन अर्ज दाखल करण्याची वेळ येते तिथे उमेदवार राहू शकतात का? असेही पाटील म्हणाले. त्यांनी त्रुटी संदर्भात पत्र त्या जिथे राहतात तिथे का पाठवलं नाही? इतर सगळा संवाद फोनवर ई-मेलवर होतो, मग त्रुटी नोटीस ई-मेल किंवा फोनवर का कळवलं नाही? असा सवाल उमेश पाटील यांनी केला आहे. सचिन मुळीक हे आरोपी आहेत. उद्या न्यायालयात त्याची चिरफड होईल असे पाटील म्हणाले. आम्ही अर्जाची सत्यप्रत मागणी केली मग का दिली नाही? असा सवाल देखील पाटील यांनी केला. मी स्वतः जिल्हाधिकारी आणि अधिकृत उमेदवारसाठी तहसीलदार यांना फोन केला होता. जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप केला म्हणून किमान शौचालय दाखला आणि मतदार यादीची प्रत मिळाल्याचे उमेश पाटील म्हणाले. राजन पाटील म्हणाले होते की मी अर्जावर हरकत घेणार नाही. मग नगराध्यक्ष पदासाठी डमी उमेदवार त्यांनी भरायला लावला. तो अर्ज केवळ उज्वला थिटे यांच्या अर्जला आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आला होता असे उमेश पाटील म्हणाले. सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरला होता मग त्यांनी अर्ज माघार घेण्याआधीच जल्लोष का केला? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.
माफ करणार नाही, उमेश पाटलांचा राजन पाटलांना इशारा
सगळे बेधुंद झाले होते, गाव आनंदात बुडाले होते हे सगळं षडयंत्राचा भाग होता असे उमेस पाटील म्हणाले. काका मला वाचवा असे म्हणून राजन पाटील हे अजित पवारांच्या पायावर लिन झालेत. त्यांना माहित आहे की अजित दादांचा कोप झालं तर काय होईल? माफ करायचं की नाही आमच्या नेत्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही मात्र माफ करणार नाही असा इशारा यावेळी उमेश पाटील यांनी राजन पाटील यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
























