दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर अंत्रोळीतील मंतिमंद मुलांची निवासी शाळा देखील सुरु करण्यात आलेली होती. प्राथमिक माहितीनुसार, शाळेतील एका केअर टेकरला सुरुवातील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच विद्यार्थ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली आहे. मतिमंद मुलांच्या या निवासी विद्यालयात जवळपास 69 जण शिकण्यासाठी आहेत. त्यातील तब्बल 43 विद्यार्थी एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर अंत्रोळीतील मंतिमंद मुलांची निवासी शाळा देखील सुरु करण्यात आलेली होती. प्राथमिक माहितीनुसार, शाळेतील एका केअर टेकरला सुरुवातील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच विद्यार्थ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. बुधवारी काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज देखील काही विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
निवासी विद्यालय असल्याने सर्व विद्यार्थी सहज एकमेकांच्या संपर्कात येत होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर झाला आहे. मागील अठवड्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कालच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद कऱण्याचा निर्णय घेतला. 7 मार्चपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद असणार आहे. मात्र आता एकाच वेळी इतके विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळ्याने आरोग्य विभागाची चिंता मात्र वाढली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी शाळेस तात्काळ भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांची पाहणी केली असता निवासी शाळा असल्याने पुरेशा प्रमाणात आयसोलेशनची व्यवस्था आहे. तसेच विद्यार्थ्यांची प्रकृती ही स्थिर असल्याने शाळेतच उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. केवळ एका विद्यार्थ्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवल्याची माहिती डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.

सोलापुराचे जिल्हाधिकारी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह तर काही वरीष्ठ अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठकीपुर्वी त्रास जाणवू लागण्याने त्यांनी बैठकीस हजेरी न लावता कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. पोलिस प्रशासनातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. दिपाली धाटे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त बापु बांगार यांना देखील कोरोनाची लागण झालीय. यासर्व अधिकाऱ्यांची परिस्थिती स्थिर आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
























