Anna Hazare : एकतर लोकायुक्त कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा; अण्णा हजारेंचा मविआ सरकारला इशारा
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
अण्णा हजारे यांनी आज माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सत्ता कार्यकाळात आश्वासन दिले होते. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारनेदेखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने लेखी आश्वासन दिले होते. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठकाही पार पडल्या होत्या. आता दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नसल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
अण्णा हजारे यांनी पुढे म्हटले की, मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत. नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील 35 जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाली असल्याची माहिती अण्णांनी दिली.
केजरीवालांवर नाराजी
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यात सत्ता आली. पण त्या राज्यात लोकायुक्त कायदा तयार करण्यात आला नाही, याचे दु:ख वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: