राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा, 60 फूट उंच, 100 वर्षे टिकणार; सरकारने काढली निविदा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात यावेळी कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, यासाठी राज्य शासनाने 500 पेक्षा जास्त पानाचे निकष असणारी निविदा काढली आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमी भावना संतप्त होत्या. 26 ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर आता तब्बल एका महिन्याच्या आत राज्य सरकारने मालवण मधील राजकोट किल्यावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत ही निविदा प्रक्रिया केलेली आहे.
राज्य शासनाने राजकोट किल्ला वर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्धी केली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. पुतळा कोसळल्यानंतर एका महिन्याच्या आत ही निविदा राज्य शासनाने जाहीर केल्यामुळे नवीन पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आता राज्य शासन महत्त्वाची पावले उचलत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारणार
पुतळा दुर्घटनेनंतर पुतळा उभारण्यासाठी एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली होती. त्या कमिटीच्या अहवालानुसार नवीन पुतळा उभारण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारने तातडीने हाती घेतले आहे.स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणून ओळखले जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल या पुतळाच्या धर्तीवर मालवणमध्ये राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार आहे. यामध्ये सर्व गोष्टींची काळजी देखील घेण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात यावेळी कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, यासाठी राज्य शासनाने 500 पेक्षा जास्त पानाचे निकष असणारी निविदा काढली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची 100 वर्ष गॅरंटी
आता मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची 100 वर्ष गॅरंटी असणार आहे, अशी माहिती देखील हा निविदेत आहे. तसेच 10 वर्षे या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदाराने करायची आहे. 3 फुटाचे फायबर मॉडेल तयार करून ते कलासंचलनांकडून मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरवात होणार आहे. आयआयटी पवई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुभव असणाऱ्या व्यक्तींना हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात येणार असल्याचे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 26 ऑगस्ट ला पुतळा कोसळल्यानंतर सर्वच ठिकाणी शिवप्रेमीच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. पण आता नव्याने पुतळा उभारणीचे काम राज्य शासनाने हाती घेतल्यामुळे कुठेतरी शिवप्रेमी समाधान व्यक्त केलं जातं आहे.























