Shrikant Shinde : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार, श्रीकांत शिंदेंचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा आरोप
Shrikant Shinde Viral Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदेंकडे कारभार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत तरपे यांनी केला आहे.
Shrikant Shinde Sitting on Cm Chair Viral Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी केला आहे. रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो समोर आणला आहे. त्या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार करत असल्याचा आरोप रविकांत वरपे यांनी केला आहे. यावरून आता वातावरण तापलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही श्रीकांत शिंदे यांचे फोटो शेअर करत गंभीर आरोप केला आहे. मेहबूब शेख यांनी फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, 'मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. मुख्यमंत्री पदाची गरीमा धुळीस मिळवण्याचे काम हे शिंदे पिता पुत्र करत असल्याचे दिसत आहे. हा कोणता राजधर्म आहे ? बाप नंबरी ,बेटा दस नंबरी ..! याचा अनुभव महाराष्ट्र घेत आहे ..!'. मेहबुब शेख यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. मुख्यमंत्री पदाची गरीमा धुळीस मिळवण्याचे काम हे शिंदे पिता पुत्र करत असल्याचे दिसत आहे. हा कोणता राजधर्म आहे ?
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) September 23, 2022
बाप नंबरी ,बेटा दस नंबरी ..!
याचा अनुभव महाराष्ट्र घेत आहे ..! pic.twitter.com/4455ywHTxC
पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदेंकडे कारभार- राष्ट्रवादी
श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण
या प्रकरणावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे की, 'मला वाटतं विरोधकांनी आता टीका करायला काही उरले नाही म्हणून ते असे बोलत आहेत. हे आमचे खासगी निवासस्थान आहे, इथे आम्ही दोघे गेली अनेक वर्षे बसतो आणि लोकांचे प्रश्न सोडवतो. आज मुख्यमंत्री यांची एक व्हीसी होती, त्यासाठी 'महाराष्ट्र शासनाचा' बोर्ड मागे ठेवला होता पण मला ते माहीत नव्हतं'. यापुढे श्रीकांत शिंदे म्हणाले की, 'मुख्यमंत्री अठरा तास काम करत आहेत, त्यांच्यावर टीका करायला बाकी कोणते मुद्दे मिळत नाही, म्हणून असे मुद्दे काढले जात आहेत. लोकांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, असे मुद्दे काढून काही होणार नाही, आम्ही आमचे काम करत आहोत.'
महत्त्वाच्या इतर बातम्या