Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आलेत.
Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) दारूण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे गुरुवारी पहिल्यांदाच नाशिक (Nashik News) दौऱ्यावर आले. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तीन दिवस विविध बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, राज ठाकरे तीन दिवसीय नाशिक दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे (Mumbai) रवाना होणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मनसेने विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी पाच जागांवर उमेदवारी दिली होती. नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा देखील झाल्या होत्या. परंतु, पाचही ठिकाणी मनसेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. तसेच माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह मनसेतील काही बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे मुंबईकडे रवाना होणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील बंडाळी अधिक उफाळून येऊ नये यासाठी ठाकरेंनी नाशिकला धाव घेतल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी नाशिकमध्ये त्यांचे आगमन झाल्यानंतर ते ‘ॲक्शन मोड’वर आले. पक्षातील निवडक पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांनी पक्षसंघटनेचा आढावा घेतला. मात्र राज ठाकरे नाशिक दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना होणार आहेत. दौरा अर्धवट सोडून जाण्याचे कारण समजू शकलेले नाही. काल पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
भाजपच्या महिला आमदार राज ठाकरेंच्या भेटीला
दरम्यान, राज ठाकरे हे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांनी भेट घेतली. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेने विधानसभा निवडणुकीत उमेदवार मागे घेतला होता. याचा देवयानी फरांदे यांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देवयानी फरांदे यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट नाशिकमध्ये चर्चेत आली आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर देवयानी फरांदे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले आहेत. त्यामुळे मी त्यांची भेट घेतली. आगामी सिंहस्थ, नाशिकचा विकास या विषयांवर राज ठाकरेंशी चर्चा झाली. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेने विधानसभा निवडणुकीत उमेदवार मागे घेतला, त्याचा निश्चितच मला फायदा झाला. मात्र, त्या संदर्भात आज कुठलीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
मोठी बातमी : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची 'एबीपी माझा'ला माहिती!