Maharashtra Politics Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, म्हणाले, फक्त 14 खासदार नव्हे तर..
Maharashtra Politics Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले असून आज पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics Eknath Shinde : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करत शिंदे गटाने आपली स्वत: ची कार्यकारणी जाहीर केली आहे. दिल्लीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वकिलांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. खासदारांबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केले.
सोमवारी राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर आणि बुधवारी सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचे समजले जात आहे. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी दिल्लीत ओबीसी आरक्षणाच्या बाबत चर्चा करण्यासाठी वकिलांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज होणारी सुनावणी बुधवारी 20 जुलै रोजी होणार आहे.
खासदारांबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?
शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या खुप चर्चा सुरु आहे पण मला अद्याप काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींची भेट घेणार ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 12 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. या भेटीनंतर या बंडखोर खासदारांचा वेगळा गट लोकसभेत होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, ओबीसी आरक्षण, सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा अध्यक्षांना आज पत्र दिले जाणार
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. उर्वरित 12 खासदार आता शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती आहे. यासंबंधी लोकसभा अध्यक्षांना आज पत्र दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असून शिवसेनेच्या लोकसभेतील बारा खासदारांना घेऊन ते पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे.
लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतच पत्र सोपवलं जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत प्रतोद असल्याचे सांगत शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे.