Shivsena : फुटीर गटाचा आता कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 सुरू, शिवसेनेचे पाऊल त्यांच्या छाताडावर असेल: संजय राऊत
Sanjay Raut : फुटीर गटाने त्यांचा मालक बदलला असून त्यांच्या नव्या कार्यकारणीला कोणताही काही अर्थ नाही, हा सर्व मनोरंजनाचा प्रकार असल्याची टीका खासदार संजय राऊत म्हणाले.
मुंबई: फुटीर गटाचा आमदारांना आपल्यासोबत राखण्यासाठी शेवटचा प्रयत्न सुरू असून त्यांच्या नव्या कार्यकारणीला काही अर्थ नाही, आधी विधीमंडळात कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 झाला, आता त्याच्या दुसरा भाग सुरू असल्याचं असं खासदार संजय राऊत म्हणाले. या देशातील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालयात फक्त न्यायच होईल असंही ते म्हणाले. फुटीर आमदारांनी त्यांचा मालक बदलला, आता शिवसेनेचे पाऊल त्यांच्या छाताडावर असेल असंही ते म्हणाले.
ज्या ठिकाणी ठाकरे, त्या ठिकाणी शिवसेना, बाकी गोष्टींना अर्थ नसल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले. राजन विचारे हेच लोकसभेतील शिवसेनेचे प्रतोद असून जर खासदार फुटले तर त्यांना कायदेशीर भाषेत उत्तर देऊ असंही ते म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, जे काही वृत्त माध्यमातून दाखवण्यात आलं ते म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सीझन टू आहे. पहिला सीझन विधीमंडळात दिसला. आता दुसरा सुरू झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना त्यांनी हा सर्व प्रकार केला. 16 अपात्र आमदारांच्या संबंधी जी शिवसेनेची याचिका आहे ती कायद्याला धरुन आहे. फुटीर गटाला अद्याप पक्ष म्हणून मान्यता नाही. हा फुटीर गट बाळासाहेबांच्या 56 वर्षांच्या शिवसेनेच्या कार्यकारणी बरखास्त करतो हे कॉमेडी, मजेशीर आहे.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. अनेकांनी फुटून जाणून गट निर्माण केला असेल, त्यांना कोणताही अधिकार राहिला नाही. या सर्वाचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. जर लोकसभेमध्ये असा कोणी प्रयत्न करणार असेल त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं जाईल.
स्वत: मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यामुळे त्यांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ बेकायदेशीर असल्याचं संजय राऊत म्हणाले. या देशातील न्यायालयावर आमचा विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात फक्त न्यायच होईल असंही ते म्हणाले.