मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, दबाव होता, पण नाही गेलो : संजय राऊत
Shivsena MP Sanjay Raut Full PC : मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, दबावही होता, पण मी गेलो नाही, असा खळबळजनक खुलासा संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
Shivsena MP Sanjay Raut Full PC : एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shiv Sena) मुख्यमंत्री नाही हे कालच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यांच्यावरील कारवाई ही शिस्तभंगाची कारवाई आहे, असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तसेच, शिवसेनेचे आमदार हे शिंदे गटाला जाऊन मिळतील, हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत कालच्या ईडी चौकशीवरही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. तसेच, राज्यात नवं सरकार, नवीन विटी, नवीन दांडू, असं म्हणत राऊतांनी नवनिर्वाचित सरकारला टोला हाणला आहे. त्याचप्रमाणे, मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, दबावही होता, पण मी गेलो नाही, असा खळबळजनक खुलासाही राऊतांनी केला आहे.
...हे आमच्या रक्तात नाही : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "आपला जो अंतरात्मा असतो तो सांगतो की, मी काही केलेलं नाही, तपास यंत्रणांना सामोरं जायला पाहिजे. त्याच आत्मविश्वासानं मी गेलो आणि दहा तासांनी बाहेर आलो. मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, पण मी नाही गेलो. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यासोबत राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि असं वागायचं, हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाये, पर वचन ना जाये, हे आम्हाला बाळासाहेबांनी आणि हिदुत्वानं शिकवलेलं आहे. मी या बाबतीत अत्यंत बेडर आहे. इतरांनाही मी सांगतो, जर सत्य तुमच्या बाजूनं असेल, तर घाबरण्याची गरज नाही. मी काल अधिकाऱ्यांना सांगितलं, बॅग भरुन आलोय आणि मी घाबरणार नाही. तुम्हाला जे हवेत ते प्रश्न विचारु शकता. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो."
फडणवीसांच्या मागे 'उप' शब्द लावायला जड जातयं : संजय राऊत
"मला तोंडात अजून उपमुख्यमंत्री येत नाही. माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण सतत आपण त्यांना बोलत राहिलो. पण 'उप' हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला जड जात आहे. तरीही मी देवेंद्रजींच्या संदर्भात होत असेल तर त्यांचा हा पक्षाचा प्रश्न आहे.", असं संजय राऊत म्हणाले. तसेच, "जे मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत होते. पक्षाची बैठक होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारा असं सांगितलं जातं. जे मुख्यमंत्री झाले ते त्यांचंया मंत्रिमंडळात ज्युनिअर होते. पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्यांचं त्यासाठी कौतुक केलं पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले.
मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठीच मुख्यमंत्री केलं, संजय राऊतांचा घणाघाती आरोप
"शिंदे गटाकडून दिशाभूल केली जात आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. असं जर कोणी करत असेल, तर त्यांच्या मनात त्यांनी जो गुन्हा केलाय, त्याची खदखद आहे. आपण आपल्या नेत्याला फसवलं आहे, आपण शिवसैनिकांना फसवलं आहे, या खदखदीमुळे हे सर्व सुरु आहे. लोकांची दिशाभूल करणं ही भाजपची पद्धत. त्याच पद्धतीनं शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक वागत आहेत. राज्यातील जनता, लाखो कडवट शिवसैनिक दूधखुळे नाहीत. पण नवीन राज्य आलेलं आहे. नवीन विटी, नवीन दांडू त्यांनी त्यांचं काम करावं महाराष्ट्र, मुंबईसाठी. भाजपला जे हवंय, मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून तोडायची आहे. शिवसेनेची मुंबईतील ताकद नष्ट करायची आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवू दिली आहे. तुम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे, मुंबईवर शिवसेनेचा, बाळासाहेबांचाच झेंडा राहील. पण नाही, त्यांना मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठीच मुख्यमंत्री केलं आहे." , असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचे आमदार हे शिंदे गटाला जाऊन मिळतील, हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगताना संजय राऊत म्हणाले की, "काल शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण मला भाजपच्या एका शाखेनं बोलावलं होतं. मी नव्हतो, पण माझ्याकडे माहिती आली. काल शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली. चर्चा होते, चर्चा आधीही झाली आहे. याचा अर्थ आमदार, खासदार गेले असा होत नाही. शिवसेनेमध्ये आमदार, खासदार नव्यानं निवडणून आणण्याची ताकद आहे. शेवटी आमदार, खासदार बाहेर गेले, तरी कार्यकर्त्यांची फळी आणि मतदार शिवसेनेसोबत आहे. आणि हे लोक कोणत्याच मोहाला, दबावाला बळी पडत नाही."
मी फुटणारा बुडबुडा नाही : संजय राऊत
"राज्यसभा निवडणूकीत मला पाडण्याचा प्रयत्न झाला. मी राज्यसभा निवडणुकीत पडलो असतो, तरी मी शिवसेना सोडली नसती, मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत राहिलो असतो. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच राहिलो असतो. मी बाळासाहेब यांच्या मूळ विचाराचा माणूस आहे. मी फुटणारा बुडबुडा नाही.", असंही राऊत म्हणाले.