Sanjay Raut : शाहू घराण्यानं सत्यवादी परंपरा कायम ठेवली, भाजपची उडी फसली, संजय राऊतांचा टोला
शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. तर संभाजीराजे यांच्याबद्दल प्रेम असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.
Sanjay Raut : कोल्हापूरच्या मातीत आजही प्रामाणिकपणा कायम आहे. शाहू घराण्यानं सत्यवादी परंपरा कायम ठेवली असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. श्रीमंत शाहू महाराज यांनी देशासाठी आदर निर्माण केला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीमंत शाहू महाराज यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्याशी आजही कौटुंबिक संबंध कायम असल्याचे संजय राऊत म्हणाले. शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. तसेच संभाजीराजे यांच्याबद्दल प्रेम आहे. त्या वादातून राजकारण करणार नाही. संभाजीराजे यांना पुढे करुन राजकारण करायचे होतं, मात्र त्यांची उडी फसल्याचा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
संभाजीराजे यांच्याबद्दल प्रेम
शाहू महाराजांना भेटून त्यांना अभिवादन करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे संजय राऊत म्हणाले. आम्हाला ज्याप्रमाणे शाहू महाराजांविषयी आदर आहे, त्याचप्रमाणे संभाजीराजे यांच्याबद्दल देखील प्रेम आहे. आम्हाला त्या वादातून कोणतेही राजकारण करायचे नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढे करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची उडी फसली आहे. शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही. आमची भूमिका स्पष्ट होती असेही राऊत म्हणाले. छत्रपतींना समर्थक नसतात, संपूर्ण प्रजा त्यांची असते असेही राऊत यावेळी म्हणाले.
सगळं महाविकास आघाडी म्हणूनच ठरलं पाहिजे
आता कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे सर्व लोक आहेत. महाविकास आघाडीच्या लोकांशी माझा संपर्क सुरु आहे. आता फक्त एका-दोघांचे ठरलय म्हणून असे चालणार नाही. इथे महाविकास आघाडी म्हणूनच ठरले पाहिजे. नाहीतर तुमच्याशिवाय आम्ही ठरवू आणि आमचा निर्णय घेऊ असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेना बेळगावात येईल, सर्व निवडणुका लढवेल
महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या पद्धतीने विस्कळीत होते, त्यामुळं त्या भागात अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा फटका बेळगावलाच नाही, तर त्याचा फटका कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला होत आहे. पण आता शिवसेना बेळगावात येईल, सीमाभागातील व बेळगावातील सर्व निवडणुका शिवसेना लढवेल, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला. संजय राऊत हे सध्या नियोजीत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
महत्वाच्या बातम्या: