देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकार स्थापन करायला गेलेत हे आम्हाला माहीत होते : संजय राऊत
राज्यात सरकार स्थापन करताना आम्ही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवली नाही, याबाबत कमालीची पारदर्शकता होती. अजित पवार शपथविधीला गेले याबाबतही आम्हाला माहिती होती, असे संजय राऊत यांनी सांगितले.
नाशिक : भाजपने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली होती, ही गोष्ट खरी आहे. याबाबत मला माहिती होती असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. कारण, त्यावेळी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी उत्तेजीत झाली होती, कोणाबरोबरही जायला भाजप तयार होती असे राऊत म्हणाले. सरकार स्थापन करताना आम्ही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवली नाही, याबाबत कमालीची पारदर्शकता होती. अजित पवार शपथविधीला गेले याबाबतही आम्हाला माहिती होती, असे राऊत यांनी यावेळी सांगितले. पारदर्शकता असल्यामुळेच सगळे आमदार आणि अजित पवार पुन्हा माघारी आल्याचे यावेळी राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी मास्क लावावा..
राजकारणात इतकी मोठी घडामोड घडत असताना पारदर्शकता असायला पाहिजे, असे राऊत म्हणाले. सत्ता स्थापन करत असताना जे आडवे आले त्यांना बाजूला सारत आम्ही पुढे गेलो. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशात निर्बंध जर आले तर राज्याचे अर्थचक्र अडकून पडेल, रोजगार, धंदा यावर पुन्हा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपले पंतप्रधान मास्क लावा असे सांगतात पण ते स्वत: लावत नाहीत. त्यामुळे त्यांचे एकूण आपण मास्क लावत नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. याउलट मुख्यमंत्री मास्क लावतात. पंतप्रधान मास्क लावत नसल्यामुळे जनताही मास्क लावत नाही, असा टोलाही राऊतांनी मोदींना लगावला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी मास्क लावावा असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.
दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीनंतर महमोहन सिंह यांच्याइतका निष्कपट मनाचा पंतप्रधान मी पाहिला नसल्याचे वक्तव्य देखील यावेळी राऊत यांनी केले. मनमोहन सिंह यांच्या काळात कधीही सुडाची कारवाई झाली नाही. आज ज्यांचे घोडे उधळले आहेत. त्यांना त्यावेळी वाचवण्याचे काम शरद पवार यांनी केल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले. राजकारणात संयम महत्वाचा असतो. सत्तेचा घटनेचा गैरवापर करु नये, असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी:
- Kalicharan Maharaj : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला बेड्या, खजुराहोमधून पहाटे अटक
- चिंताजनक! कोरोनाबाधितांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ, 24 तासांत 13 हजारबाधितांची नोंद