(Source: Poll of Polls)
नेदरलँड्समध्ये घुमला शिवरायांचा जयजयकार, सातासमुद्रापार शिवराज्याभिषेक दिनी भगव्या पताका उंचावल्या!
Shivrajyabhishek Din 2024 : सातासमुद्रापार नेदरलँड्सच्या भूमीत मराठी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
मुंबई : सातासमुद्रापार नेदरलँड्सच्या (Netherlands) भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जयजयकार घुमला. निमित्त होते शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे. नेदरलँड या युरोपीय राष्ट्रात मराठी बांधवांनी उभारलेल्या 'अल्मेरे महाराष्ट्र मंडळाने' शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din 2024) मोठ्या उत्साहात साजरा केला. भगव्या पताका हाती धरून छत्रपतींचा जयघोष करण्यात आला.
महाराष्ट्रातून नेदरलँड्स देशात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या मराठी बांधवांनी अल्मेरे येथे महाराष्ट्र मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून नेदरलँड्समधील मराठी माणसांना एका धाग्यात बांधण्याचे कार्य केले जात आहे. अल्मेरे महाराष्ट्र मंडळ हे महाराष्ट्रातील विविध परंपरा, सांस्कृतिक सण-उत्सव साजरे करून आपली माती आणि नाती जपण्याचं कार्य करीत आहेत.
महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा उद्देश
अल्मेरेमध्ये घरापासून दूर असलेल्या महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जपण्याचा अल्मेरे महाराष्ट्र मंडळाचा उद्देश आहे. मकरसंक्रांती, गुढीपाडवा, दिवाळी या सारखे पारंपारिक सण साजरे करण्यासाठी अल्मेरे आणि अल्मेरच्या आजूबाजूच्या भागातील मराठी भाषिक कुटुंबे आणि मराठी संस्कृतीशी असलेली कुटुंबे एकत्र आणण्याचा मंडळाचे ध्येय आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान आपल्यातील लपलेल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य या मंडळाकडून केले जाते. अल्मेरे महाराष्ट्र मंडळाची स्थापना नेदरलँड्समध्ये स्थायिक बिपीन पाटील (मुंबई), दिपाली पाटील (बुलढाणा), उदय परमाळे, स्वाती परमाळे (पुणे), हर्षद इनामदार व कीर्ती इनामदार (कोल्हापूर) यांनी केली. नेदरलँड्समधील अल्मेरे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यात जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प. मराठी शाळेत कार्यरत असलेले ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांची कन्या निशा पाटील यांनी सहभाग घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या