(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivjayanti 2023 : शिवजयंतीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना राज्य सरकारकडून दिलासा, शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी
Shivjayanti: शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी सरकारकडून शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलंय.
नवी दिल्ली : शिवजयंतीच्या (Shivjayanti) पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे.
शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी सरकारकडून शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलंय. त्यामुळेच शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होतील असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 'शिवकालीन गाव' हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच 'महाशिव आरती'चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. यात शिवनेरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत.
तीन दिवस चालणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे
18 फेब्रुवारी 2023
सायं. 6.30 वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023 उदघाटन .
सायं. 7 ते रात्री 10 वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम.
19 फेब्रुवारी 2023
स. 9 ते 11 वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
दु. 3 ते 5 वा. शिववंदना
सायं. 6.15 ते 7 वा. महाआरती कार्यक्रम
सायं. 7 ते रात्री 10 वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम
20 फेब्रुवारी 2023
सायं.7 ते रात्री 10 वा. जाणता राजा कार्यक्रम
तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने आणि खाद्यपदार्थांच्या 300 स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.