(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Jayanti 2023 live updates : शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री उपस्थित...
Maharashtra Shiv Jayanti Celebration : छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
LIVE
Background
Shiv Jayanti 2023 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील शहरा-शहरांत शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. या दिवशी समाजाच्या सर्व स्तरांतून शिवभक्त शिवरायांना मानवंदना देतात. या दिवशी त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. गावखेड्यांपासून शहरांत शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील शिवभक्त शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात.
आग्रा येथील लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार
या वर्षीच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आग्रा येथील लाल किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'दिवाण-ए-आम' सभागृहात शिवजयंती साजरी होणार आहे. या सोहळ्याला आधी पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. मात्र, सामाजिक संस्थांनी या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर आता शिवजयंतीचा हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
मराठ्यांच्या इतिहासात अनन्य साधारण महत्त्व
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना आग्र्यात नजरकैदेत ठेवलं होतं. या दोघांनाही त्या ठिकाणी मारण्याचा कट औरंगजेबानं आखला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं आग्य्रातून सुखरूप सुटका करुन घेतली. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा व्हावा अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे.
शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात
या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार तयारी आग्रा किल्ल्यात सुरु झाली असून, यावेळी आकर्षक फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात येणार आहे. आग्रा येथील शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येणार असून, सुमारे एक कोटी शिवभक्त त्यात सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संदर्भात आयोजकांनी तयारी केली असून, सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एक स्वतंत्र लिंकही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शिवजयंती निमित्ताने राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी गल्ली शिवजयंती निमित्ताने दुमदुमून जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
गल्ली ते दिल्ली साजरी होणार शिवजयंती; शिवभक्तांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा प्लॅन
Shiv Jayanti 2023 : बीड मधील विद्यार्थ्यांनी साकारला स्वराज्याभिषेकाचा देखावा; शिवप्रेमींची गर्दी
Shiv Jayanti 2023 : बीड शहरातील डॉक्टर भीमराव पिंगळे महाविद्यालयातील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य अभिषेकाचा देखावा साकारला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा वेश परिधान केलेल्या या विद्यार्थ्यांनी स्वराज्याची शपथ घेतानाचा देखावा साकारल्याने हा देखावा बघण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
लंडनच्या संसद चौकात ‘जय शिवराय’, ब्रिटेनमधील विद्यार्थ्यांनि साजरी केली शिवजयंती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. लंडन येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी लंडन येथिल संसद चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
Shiv Jayanti 2023 : शिवजयंती निमित्त 3100 चौरस फुटांची रांगोळी; राजमुद्रेत शिवरायांसह अष्टप्रधान मंडळाने साकारली हुबेहूब प्रतिकृती
Shiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र साजरी केली जातेय. परभणीत सुदर्शना कच्छवे आणि तिच्या सहकारी कलाकारांनी 5 दिवस सतत काम करून अनोख्या पद्धतीने शिवरायांना वंदन केले आहे. तब्बल 3100 चौरस फुटांत राजमुद्रेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याभोवती अष्टप्रधान मंडळ असलेली रांगोळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शहरातील गांधी पार्कमध्ये ही अतिशय देखणी प्रतिकृती या कलाकारांनी साकारली असून यासाठी 500 पोते रांगोळी या कलाकारांना लागली आहे. शिवरायांसह त्यांचे अष्टप्रधान मंडळ असलेली ही प्रतिकृती पाहण्यासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली आहे.
Shiv Jayanti 2023 :हातात मशाल घेऊन चंद्रकांत खैरेंनी केलं शिवरायांना अभिवादन
Shiv Jayanti 2023 : धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी हातात मशाल घेऊन औरंगाबादमधील क्रांती चौक येथे शिवरायांची आरती केली. त्यांनी हातात मशाल घेऊन शिवरायांना अभिवादन केले. यावेळी चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. चंद्रकांत खैरे यांनी सर्व शिवप्रेमींना आणि नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
Shiv Jayanti 2023 : परळीत धनंजय मुंडे यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन
Maharashtra Beed Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं असून यावेळी त्यांनी भगवा ध्वज फडकून शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मानवंदना दिली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.