संजय राऊत यांच्या सभेसाठी चोरीची वीज वापरली, महावितरणाकडून दंडात्मक कारवाई
Sanjay Raut : संजय राऊत यांच्या सभेसाठी चोरीची वीज वापरल्यावर शिक्कामोर्तब झालेय. महावितरणने संबंधित सभेसाठी डेकोरेशनचे काम करणाऱ्या व्यक्तीवर चोरीची वीज घेतल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे.
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊत यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी वीज चोरी झाल्याचं समोर आलेय. गुरुवारी संजय राऊत नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या सभेसाठी चोरीची वीज वापरल्यावर शिक्कामोर्तब झालेय. महावितरणने संबंधित सभेसाठी डेकोरेशनचे काम करणाऱ्या व्यक्तीवर चोरीची वीज घेतल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे.
एबीपी माझाने संजय राऊत यांच्या सभेसाठी वीज चोरी केल्याची बातमी दाखविली होती. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये सभेसाठी डेकोरेशन करणारा दोषी आढळला. त्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. गुरुवारी संजय राऊत यांची दक्षिण नागपूर परिसरात गजानन नगर मध्ये सभा झाली होती.
सभास्थानी शिवसेनेच्या राजकीय कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वैधरित्या वीजेचं कनेक्शन घेण्यात आलेलं नव्हतं. डेकोरेशनचं काम करणारे बिरजू मसरामने बेकायदेशीररित्या वीज वापरली. तारावर आकडे टाकून बिरजू मसराम याने वीज चोरी करत संजय राऊत यांच्या सभेसाठी वापरल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बिरजू मसराम यांच्यावर विद्युत कायदा कलम 135 अन्वये दंडात्मक कारवाई केली आहे. बिरजू मसरम याच्याकडून 3 हजार 997 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
त्यावेळी फडणवीसांना सुबुद्धी आली असती तर आज ते मुख्यमंत्री असते; संजय राऊतांचा टोला -
जर राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुबुद्धी आली असती, त्यांनी शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. दक्षिण नागपूर परिसरात गजानन नगर मध्ये एका जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या मातीत असे गुण आहे की तिथे गेल्यानंतर संजय राऊत यांना सुबुद्धी येईल असे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडून संजय राऊत यांनी फडणवीस सुबुद्धीने वागले असते तर आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते असे वक्तव्य केलं.