Kishori Pednekar : नारायण राणे लढवय्ये, पण रामदास कदमांमुळे शिवसेनेतून बाहेर पडले : किशोरी पेडणेकर
Kishori Pednekar : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kiroshi Pednekar) यांनी मात्र, नारायण राणे यांचं कौतुक केलंय.
मुंबई : 2005 ला नारायण राणे (Narayan Rane) शिवसेना ( Shiv Sena) पक्षातून बाहेर पडले. तेव्हापासून ते शिवसेनेवर टीका करायची एकही संधी सोडत नाहीत. अनेकवेळा तर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. परंतु, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kiroshi Pednekar) यांनी मात्र, नारायण राणे यांचं कौतुक केलंय. नारायण राणे हे लढवय्ये नेते आहेत असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडण्यास रामदास कदम कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
किशोरी पेडणेकर यांनी नुकताच 'एबीपी माझा डिजीटल'सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक असलेले आणि सतत त्यांच्यावर टीकेचे बाण सोडणाऱ्या नारायण राणेंचं किशोरी पेडणेकर यांनी कौतुक केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नारायण राणेंसारखी व्यक्ती शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी रामदास कदम हेच कारणीभूत आहेत. नारायण राणे हे लढवय्ये आहेत. पण सतत त्यांच्या कानात काहीतरी सांगून, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही-काही सांगून नारायण राणे यांना भडकावलं गेलं. त्यामुळेच नारायण राणे पक्षातून बाहेर पडले, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. रामदास कदम कधीच समाधानी नव्हते. आम्ही 40 वर्षे शिवसेनेत काम करत आहोत. रामदास कदम यांच्या मागची भाषणे काढून पाहिली तर हे समाधानी नव्हते हेच लक्षात येतं, त्यांच्या मागच्या भाषणात ते कायमच वैतागलेले दिसतात. रामदास कदम यांच्याबद्दल आम्हाला आदर होता. परंतु, आता त्यांच्याबद्दल आदर राहिला नाही, असे पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
"राजन साळवींसारख्या प्रामाणिक आमदाराच्या घरी फूटपट्टी लागली गेली. त्या आमदाराच्या डोळ्यांत पाणी कसं बघवलं.? तो शिवसैनिक नाही का? तुमच्याकडे आले नाही तर ते शिवसैनिक नाहीत का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलाय. शिंदे गटाच्या जनआशीर्वाद यात्रेवरही किशोरी पेडणेकर यांनी टीका केलीय. "जनआशीर्वाद कसला मागताय? तुम्हीच सत्तेत आहात. तुम्ही शिधा वगैरे काय देता? शिधा देण्याची वेळच का येते याचा विचार करा. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे आम्हाला जनआशीर्वाद मिळतोय, असे पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावरही किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री झाल्यामुळे पक्ष फुटला असे खासदार जाधव यांनी म्हटलं होतं. यावर बोलता किरोशी पेडणेकर म्हणाल्या, "पक्षातून बाहेर पडायचं म्हटल्यावर काहीही आरोप केले जातात. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पक्षबांधनीसाठी चांगलं नसतं तर तुम्ही खासदार कसे झाला असतात? असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.
पाहा व्हिडीओ