'घाईघाईने मधुचंद्र केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था'; शिवसेनेची जोरदार टीका
सामना (Saamana) च्या अग्रलेखातून शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Shiv Sena Saamana On Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray) आणि शिवसेना शिंदे (Eknath shinde) गटातील नेते एकमेकांवर टीका करत असल्याचं चित्र आहे. अशात आज सामना (Saamana) च्या अग्रलेखातून शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे', असं सामनामध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळेबळे गळ्यात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्ष सोडला नाही तर पक्षांतर बंदी का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना शिंदे यांचेच डोके ठणकत राहील व एक दिवस त्यांना त्या डोक्यावरचे केस उपटत बसावे लागेल, असंही लेखात म्हटलं आहे.
औटघटकेच्या सरकारसाठी 'स्ट्रेचर' आणि अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी.
अग्रलेखात म्हटलं आहे की, त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी 'स्ट्रेचर' आणि अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो, असं लेखात म्हटलं आहे.
विश्वासघाताच्या 'डायरिया'मुळे राज्याची प्रकृती खालावली
लेखात म्हटलं आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या 'डायरिया'मुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी आणि त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधूनमधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान 20 ते 22 तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह आणि उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत हे त्या 'चाळीस' जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे हे त्यांनाच माहीत, पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. शिंदे आणि त्यांच्या चाळिसेक आमदारांनी शिवसेनेचा त्याग करून स्वतंत्र गट स्थापन केला, पण 'आमचीच शिवसेना खरी' असा दावा त्यांनी केला. हा विनोदाचा भाग झाला,असं लेखात म्हटलं आहे.
उद्या शिंदे आणि त्यांचे लोक ग्वाल्हेरला जातील आणि...
लेखामध्ये म्हटलं आहे की, उद्या शिंदे आणि त्यांचे लोक ग्वाल्हेरला जातील आणि जिवाजी राजे शिंदे यांच्या सर्व मालमत्तेवर हक्क सांगतील. ''तुम्ही कसले शिंदे? तुम्ही कसले सरदार? तुम्ही अशी काय मर्दुमकी गाजवली? मीच खरा शिंदे. त्यामुळे ग्वाल्हेरचा राजा मीच!'' असा दावा करायलाही हे लोक कमी करणार नाहीत व त्यांची मानसिक अवस्था पाहता असे दावे ते करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटास फार टोकदार प्रश्न विचारला आहे की, ''तुम्ही बंडखोर नाही तर नेमके कोण आहात?'' न्यायालयाने त्यांना आणखी एक प्रश्न विचारला, ''पक्षाचा नेता भेटत नाही म्हणून नवा पक्ष स्थापन करू शकता का?'' या दोन्ही प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत. मुख्यमंत्रीपदाची लालसा आणि ईडी वगैरेंच्या कारवाया यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी शिंदे व त्यांच्या टोळीने विश्वासघात केला, असं लेखात म्हटलं आहे.
लेखामध्ये नेमकं काय म्हटलंय...
अग्रलेखात म्हटलं आहे की, विधिमंडळातील पक्ष फोडला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला असे नाही. शिंदे गटाकडे कायद्याने दोनच पर्याय आहेत. एक तर त्या सर्व लोकांनी राजीनामे द्यावेत व पुन्हा निवडून यावे. दुसरे म्हणजे, या फुटीर गटाने दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावे, असा पेच शिंद्यांपुढे पडला आहे. त्याला त्यांच्या गटातील किती आमदार होकार देतील हा प्रश्नच आहे. पुन्हा मंत्रिपदासाठी त्यांच्या गटात मारामाऱ्या होणार, हेही उघड आहे. त्यामुळे नव्या औषधोपचारासाठी शिंदे हे आजारी पडले असावेत. शिवसेनेचे 'धनुष्य बाण' चिन्ह आम्हालाच मिळेल व आमचीच सेना खरी या त्यांच्या दाव्यातील पोकळपणाही उघड झाला आहे. शिवसेनेच्या धनुष्य बाणावर सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. त्यातूनही अनेकांना नवे आजार जडू शकतात. एक गोष्ट मान्य केली पाहिजे, शिवसेनेची बाजू सत्याची आहे व 56 वर्षांच्या आयुष्यात शिवसेनेने विश्वासघाताचे असे हलाहल अनेकदा पचवले आहे. त्यामुळे घाव घालणाऱ्यांच्याच तलवारी तुटल्या, असे इतिहास सांगतो. शिंदे व त्यांच्या गटास हे आता उमजू लागले आहे. आपण फार मोठी क्रांती केली हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. आता सोबतीला खोकी उचलणारे हवशे-नवशे-गवशे आहेत. तेही उद्या राहणार नाहीत. शिवसेनाच खरी, बाकी सर्व धोतऱ्याच्या बिया हे स्पष्टच झाले आहे. शिवसैनिक, शिवप्रेमी जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल व राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतरचा उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी शिवसेनेची लाट कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा 8 ऑगस्टला न्यायालयात सत्य व इमानदारीचाच विजय होईल. आजही न्यायालयात काही रामशास्त्री आहेत व त्यांनी न्यायाचा तराजू समतोल राखण्याचे राष्ट्रकार्य बजावले आहे. मुळात अलिबाबा व चाळीस चोरांची बाजू कायद्याने व नीतीने खरी असती तर एव्हाना संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असता. शपथविधी नाही व शिंदे-फडणवीसांच्या फक्त दिल्ली वाऱ्याच सुरू आहेत. गुरुवारी तर उपमुख्यमंत्री फडणवीस एकटेच दिल्लीला गेले. इकडे मुख्यमंत्री शिंदे अचानक आजारी पडले. एकतर शिंदे यांना दिल्लीची हवा मानवत नाही किंवा महाराष्ट्राची हवा पुन्हा बिघडली असल्याने शिंदे यांना गुदमरल्यासारखे झाले असावे. लग्न झाल्यावर पाळणा हलला नाही की लोक संशयाने पाहतात व दांपत्यास अनेक सल्ले देतात. शिंदे यांच्याबाबत तेच सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळेबळे गळ्यात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्ष सोडला नाही तर पक्षांतर बंदी का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना शिंदे यांचेच डोके ठणकत राहील व एक दिवस त्यांना त्या डोक्यावरचे केस उपटत बसावे लागेल. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. त्यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी 'स्ट्रेचर' व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे, असं शेवटी लेखात म्हटलं आहे.