तळकोकणात आगळ्यावेगळ्या शिमगोत्सवाला सुरुवात, सांगेली गावचं ग्रामदैवत झाड असलेले देशातील एकमेव मंदिर
Shimga Festival in Konkan : सिंधुदुर्गातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत्व मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते. ही आगळीवेगळी पंरपरा पूर्वापास सुरु आहे.
सिंधुदुर्ग : तळकोकणात सण म्हटल की वेगवेगळ्या रूढी परंपरा पहायला मिळतात. गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशी पासून शिमगोत्सव सुरू होतो. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा सावंतवाडीत सांगेली या गावात सुरू आहे.
या गावात देव म्हणून फणसाच झाड ग्रामस्थ एकत्र येत ठरवतात. मग ते झाडं तोडून गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करून मंदीरात ठेवलं जातं. सांगेली गावचं ग्रामदैवत झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे.
हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत्व मानलं जातं. अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत्व मानलं जातं. कोकणात शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट पहायचा असेल तर सांगेलीत गेलं पाहिजे. सांगेली गावात होळीऐवजी गिरोबाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते. यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानते. दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते. सांगेली गाव म्हणजे निसर्गसंपन्न आणि विपुल अशा फणसाच्या झाडांची भूमी. या गावावर गिरोबाची कृपादृष्टी आहे. असा गाववासीयांचा विश्वास दृढ आहे. गिरोबा या दैवताची निर्मितीच फणसाच्या खोडातून होते. यामुळे फणसाचे झाड कुठेही दिसले तरी देव भेटल्याप्रमाणे गावातील माणसे त्याला नमस्कार करतात. या गावात फणसाच्या झाडावर होळीव्यतिरिक्त कधीही शस्त्र चालवले जात नाही.
राज्यात सर्वत्र होळी सण हा पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. सांगेलीत होळी सणाला सुरुवात होते ती महाशिवरात्रीपासून आणि गिरोबाचा उत्सवा पासून आठ दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवात जिल्हावासीयांबरोबर गोवा, कर्नाटक भागातूनही भाविक दरवर्षी मोठय़ा संख्येने दाखल होत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे गिरोबाचा उत्सव गाव मर्याडीत आणि साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :