(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Resigns : शरद पवारच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींनीही दिला होता राजीनामा... वाचा काय घडलं होतं?
Sharad Pawar Retirement: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनाही त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळे राजीनामा द्यायला लागला होता.
मुंबई: ज्यांच्या राजकीय खेळीचा थांगपत्ता विरोधकांनाच काय तर आप्तस्वकीयांनाही लागत नाही अशा शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. साहेबांनी राजीनामा देऊ नये यासाठी केवळ कार्यकर्तेच नव्हे तर नेतेही भावनिक झाल्याचं दिसून आलं, शरद पवारांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसलं. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी आता जोरदार मागणी सुरू केली असून त्यावर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्याने राजकारणात खळबळ उडाल्याचं दिसतंय. पण याआधीही राजकारणात असे अनेक प्रसंग घडले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. तर 2004 साली सोनिया गांधी यांनी संसदीय नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी राजीनामे मागे घ्यावेत यासाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. अनेक कार्यकर्ते भावूक होऊन ओक्साबोक्सी रडत होते. नंतर कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावानंतर बाळासाहेबांनी आपला राजीनामा मागे घेतला होता, तर सोनिया गांधींनी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम राहून डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली.
Shivsena Balasaheb Thackeray Resigns : मुंबई मनपात शिवसेनेचा पराभव आणि बाळासाहेबांचा राजीनामा
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आपल्या शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. 1978 साली त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मुंबई महापालिकेमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पराभवानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्या आधीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 40 जागा निवडून आल्या होत्या. पण 1978 साली शिवसेनेच्या जागांमध्ये घट होऊन तो आकडा 22 वर आला होता. मनपा निवडणूक हारलो तर शिवसेनापदाचा राजीनामा देणार असं बाळासाहेबांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर मुंबईतील एका जाहीर सभेत बाळासाहेबांनी शिवसेनापदाचा राजीनामा दिला.
बाळासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसैनिकांना मोठा धक्का बसला, त्यांनी राजीनाम्याला विरोध केला आणि बाळासाहेबांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. शिवसैनिकांनी राडेबाजी सुरू केली, एका शिवसैनिकाने तर स्वतःवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसैनिकांच्या वाढत्या मागणीमुळे बाळासाहेबांनी आपला राजीनामा फाडला.
त्यानंतरही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर बाळासाहेबांवर घराणेशाहीचा आरोप होत होता. त्यावरून होणाऱ्या आरोपावरुन बाळासाहेबांनी 1989 साली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये जय महाराष्ट्र असं लिहित राजीनामा देत असल्याचे संकेत दिले. त्यानंतर शिवसैनिकांनी 'मातोश्री'बाहेर तुफान गर्दी केली आणि 'साहेब असं काही करू नका' अशी साद घातली. त्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेबांना आपण राजीनामा देत नसल्याचं स्पष्ट करावं लागलं होतं.
Congress Sonia Gandhi Resigns : सोनिया यांनी राजीनामा दिला होता
साधारण 1999 सालची गोष्ट आहे. तत्कालीन काँग्रेस पक्षाचे (Congress) ज्येष्ठ नेते शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विदेशीपणाचा मुद्दा बाहेर काढला. परदेशी वंशाची व्यक्ती भारताचा पंतप्रधान, उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होऊ शकत नाही असं सांगत त्यांनी पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधी यांच्या नावाला विरोध केला होता. यानंतर 17 मे 1999 रोजी झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारला होता. पण नंतर मात्र शरद पवार, संगमा आणि तारिक अन्वर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि सोनिया गांधी यांचा राजीनामा परत घेण्यात आला.
पण खरा ड्रामा झाला होता तो 2004 साली. 2004 साली सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचे सरकार सत्तेत आलं. एकीकडे आता सोनिया गांधीच देशाच्या पंतप्रधान होणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापवलं जात होतं. सोनिया गांधी यांनी शेवटी आपल्या 'अंतर्मनाचा आवाज' ऐकून सोनिया गांधी यांनी आपण पंतप्रधान होणार नाही असं जाहीर केलं आणि आपल्या संसदीय पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.
सोनिया गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. पक्षाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कार्यकर्ते भावनिक झाले आणि सोनिया गांधी यांनी राजीनामा परत घ्यावा अशी मागणी करु लागले. पण सोनिया गांधी यांनी आपण पंतप्रधान होणार नसल्याचं या राजीनाम्यातून स्पष्ट केलं आणि विरोधकांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यातील हवाच काढून घेतली.
आता शरद पवारांचा राजीनामा
राजकीय धुरंधर अशी ओळख असलेल्या शरद पवारांनी राजीनामा दिल्याने केवळ राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्तेच चिंतेत नाहीत, तर महाविकास आघाडीचं आता काय होणार असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शरद पवार आता काय, ते राजीनामा मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.