हॅटट्रिक बरका... शरद पवार अन् अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र येणार; नवा कार्यक्रम, ठिकाण अन् वेळही नवी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

Maharashtra Politicis : राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. 21 एप्रिलला एआय (AI) संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे सकाळी 9 वाजता बैठकीचे आयोज करण्यात आलं आहे. यावेळी हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. मागील 10 दिवसात अजित पवार शरद पवार तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. दोन्ही नेते एकत्र येणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याआधी साताऱ्यात रयत संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न देखील विचारले होते.
राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी दोन्ही गटातील नेत्यांच्या गाठी भेटी
राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात, त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे. शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांकडून सांगितलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही तसंच काहीसं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं अजित पवार म्हणाले. पिंपरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवं. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले होते. जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र आले होते, त्यानंतर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार उपस्थित होते. यावेळी दोघांमध्ये संवाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. अशातच आता पुन्हा दोन्ही नेते एकत्र येणार असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
























