Exclusive : 'मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण...' आमदार शहाजीबापू पाटील यांची स्फोटक मुलाखत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 50 आमदारांच्या पैकी एकही आमदार आयुष्यात कधीही पुन्हा त्यांच्या हाताला लागणार नाही असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.
Shahaji Bapu Patil Exclusive : शिवसेनेच्या (Shivsena) चुकीच्या धोरणामुळे आणि चांडाळ चौकडील वैतागून दोन दिवसात 50 आमदार (Shiv Sena Rebel MLA) उठावासाठी एकत्र आले हा जागतिक घटना आहे. आमच्यातील कोणीही गद्दार नसून आईच्या कुशीतूनच आम्ही खुद्दार मराठमोळी माणसे आहोत, असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळ असलेली चांडाळ चौकडी एका बाजूला आणि संपूर्ण महाराष्ट्र एका बाजूला असे चित्र असताना ठाकरे यांनी या कुजक्या चौकडीला दूर ठेऊन शांतपणे विचार केल्यास त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे मत समजून येईल, असा सल्ला शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे. काही बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच सत्ता बदल होईल अशा वावड्या उठवणाऱ्या संजय राऊत यांनी हे लक्षात ठेवावे कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 50 आमदारांच्या पैकी एकही आमदार आयुष्यात कधीही पुन्हा त्यांच्या हाताला लागणार नाही असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी लगावला. मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते पण आमच्या आग्रहामुळं त्यांनी हे पाऊल उचललं असंही शहाजी बापूंनी सांगितलं.
एकनाथ शिंदे जेम्स बॉण्ड, पण मुंबई ते सुरत त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबले नाही
मुंबई येथून आमदारांनी बाहेर पडायचे ठरवले तेव्हा शरद पवार , दिलीप वळसे पाटील, उद्धव ठाकरे आणि त्यांचा गोतावळा हे सर्व मुंबईत असताना एकनाथ शिंदे यांनी कोणाच्या कानाला खबर न लागू देता हे मिशन यशस्वी पणे राबवले. अगदी सगळ्यांना चारीमुंड्या चित करायची ताकद असणाऱ्या एकनाथ शिंदे याना आम्ही जेम्स बॉण्ड म्हणतो अशी मिश्किल टिपण्णी केली. मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते पण आमच्या आग्रहामुळं त्यांनी हे पाऊल उचललं असंही शहाजी बापूंनी सांगितलं. शिंदे यांच्यासोबत असणारे सर्व आमदार मजबूत आणि विचार करणारे असल्याने यांनी कितीही प्रयत्न केले तरी यांच्यातील एकही आमदार आयुष्यात त्यांच्या हाताला लागणार नाही असा टोला लगावला. येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो असून यातही भाजप शिवसेनाच भगवा फडकविणार असा विश्वास व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या भोवताली असणाऱ्या नेत्यांवर 'चांडाळ चौकडी' म्हणत टीका
एबीपी माझाशी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषेत उद्धव ठाकरे यांच्या भोवताली असणाऱ्या काही नेत्यांवर 'चांडाळ चौकडी' म्हणत अतिशय शेलक्या भाषेत टोलेबाजी केली. प्रत्येक आरोपाला त्यांनी सडेतोड उत्तर देताना खरी शिवसेना आमचीच असे सांगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरायचे नाही हा भारतीय लोकशाहीच्या 75 वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे असा टोला लगावला.
शहाजी पाटील म्हणाले की, शिवसेना स्थापनेच्यावेळी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावताना साताऱ्याचे किंवा कोल्हापूरच्या वंशजांची परवानगी घेतली होती का असा सवाल करीत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. त्यांचे विचार पुढे न्यायला कोणाच्या परवानगीची गरज नाही आणि केवळ रक्ताने कोणी वारसदार होत नसतो तर तो विचारांनी होतो असा टोला लगावला.
त्यांनी म्हटलं की, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची शिवसेना आमचीच असून आम्ही बाळासाहेबांचा फोटोही लावणार आणि त्यांचे विचार पुढेही नेणार आम्हाला कोणी अडवू शकत नाही असा इशारा दिला. सध्या उद्धव ठाकरे हे जे काय करीत आहेत तो सर्व पोरखेळ सुरु असल्याच्या महाराष्ट्रातील जनतेच्या प्रतिक्रिया असून या पोराटकीमुळे महाराष्ट्राची करमणूक होत असल्याचा टोलाही लगावला.
संजय राऊत कुजक्या बुद्धीचे
मी माझ्या माणदेशी भाषेतील मित्राशी संवाद करतानाचे वाक्य सगळ्या जगभर प्रसिद्ध झाले. त्यावर संजय राऊत , आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केली. संजय राऊत हे कुजके शरीर, कुचकी बुद्धी आणि कुजक्या मनाचा माणूस असल्याने ते काय बोलतात याला कोणी किंमत देत नाही. आदित्य वयाने लहान असून संजय राऊत जे शिकवतात तेच ते बोलतात पण उद्धव साहेबांनी केलेली टीका अत्यंत चुकीची होती असे शहाजीबापू यांनी सांगितले. सध्या त्यांच्या चिडखोर स्वभावामुळे आपण काय बोलतो याचे भान राहिले नसल्याने ते असे बोलले असतील असा टोलाही लगावला.
शरद पवार शिवसेना प्रमुख होते का ?
एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे सांगणाऱ्या उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर मात्र शरद पवार यांच्यामुळे आपण मुख्यमंत्री झाल्याचे सांगितले. असे असेल तर शिवसेनेचे प्रमुख तुम्ही की शरद पवार असा सवाल करून पवारांच्या या खेळीमुळे गेली अडीच वर्षे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या डोक्यावर हात ठेवले. त्यामुळे सर्व सत्ता आणि विकासनिधी हा फक्त त्यांच्या मालकीचा झाला आणि शिवसेना आमदार केवळ मोकळे फिरत राहिले असा आक्षेप घेतला. यापूर्वीही अनेक मुख्यमंत्र्यांची अर्ध्यातच सत्ता गेली मात्र यातील कोणीही कोर्टात गेले नाही असा टोला लगावला .
शिवसेना मोठी करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीत गैर काय ?
शिवसेना फुटल्यावर राज्यात जाळपोळ होईल अशी वल्गना करणारे उघडे पडले, उलट सर्वत्र एकनाथ शिंदे आणि आमचे जोरदार स्वागत होत गेले असा टोलाही लगावला. शिवसेना स्थापनेपासून ज्या नेत्यांनी शिवसेनेला 56 वर्षात सोन्याचे दिवस दाखवले त्यातील मनोहर जोशी , लीलाधर डाके , गजानन कीर्तिकर असा ज्येष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदे भेटले यात गैर काय असा सवाल करीत शिवसेना अजून मजबूत करून तिचा विस्तार करण्यासाठी या ज्येष्ठांचा सल्ला घेण्यासाठी एकनाथ शिंदे सध्या अशा नेत्यांना भेटत असल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले
बंडखोरीला चांडाळ चौकडी कारणीभूत
या बंडखोरीला संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासारखे नेते जबाबदार असल्याचे सांगताना हे कधीही जनतेतून निवडून येऊ शकत नाहीत फक्त उद्धवसाहेबांना अंधारात ठेऊन आणि चुकीची माहिती देऊन शिवसेनेला रसातळाला नेण्याचे काम करीत असल्याची टीका शहाजीबापूंनी केली. संजय राऊत यांना तर काही कामचं नसल्याने सकाळी नऊ वाजता कॅमेरावाल्यांची वाट बघत दारात बसलेले असतात, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर का गेली असा सवाल देखील शहाजीबापू यांनी उद्धव ठाकरे यांना केला . हे सर्व संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या जवळ बसून शिजवले आणि नंतर पवार यांनी सोनिया गांधींची समजूत घालून काँग्रेसला यात ओढले. त्यातून तयार झालेल्या या खिचडीमुळे फक्त शिवसेना आमदारच डरंगळले असे सांगितले.
कोरोना लाटेत काम केले मग हजारो का मेले ?
कोरोनाच्या पहिल्या लाटेत उद्धव साहेबांनी चांगले काम केले . मात्र दुसऱ्या लाटेत हे सरकार कुठे होते असा सवाल करीत रेमेडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु होता. जगण्यासाठी वाटेल त्या किमतीने जनता ते खरेदी करीत होती. ऑक्सिजन अभावी एकट्या सांगोल्यात 100 पेक्षा जास्त रुग्ण तडफडून मेले मग या स्थितीला जबाबदार कोण असे विचारात थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली .
दिल्ली दौरे केंद्राच्या आर्थिक मदतीसाठी
मुख्यमंत्री सारखे दिल्लीला जातात म्हणून टीका करणाऱ्यांवर निशाणा साधताना सध्या राज्यात महापुराचं संकट आहे. अनेक विकास कामे गेल्या अडीच वर्षांपासून अडकून राहिली आहेत. यासाठी केंद्राची आर्थिक मदत आणण्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागत असल्याचे सांगितले. मंत्रिमंडळ विस्तास येत्या चार दिवसात होणार असून कोण मंत्री असावे याचे सर्वाधिकारी सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे पाटील यांनी सांगितले .
तर महाराष्ट्रात शिवसेनेचे 90 आमदार निवडून आले असते
तुम्ही बाळासाहेबांना शब्द दिल्याप्रमाणे जर एकनाथ शिंदे यांच्यासारखा जेष्ठ कडवा शिवसेना नेता मुख्यमंत्री झाला आहे तर तुम्हाला एवढे वाईट का वाटतंय असा सवाल करीत आता शिंदे याना मान्यता देऊन पुन्हा शिवसेना वाढीचे काम एकत्रित सुरु करावे हि महाराष्ट्रातील मराठी माणसांची इच्छा असल्याचे शहाजी बापू यांनी सांगितले . गेल्यावेळी तिकीट वाटपात मिलिंद नार्वेकर आणि या चांडाळ चौकडीने घाण केली नसती तर महाराष्ट्रात शिवसेनेचे 85 ते 90 आमदार निवडून येतील अशी स्थिती होती असे पाटील यांनी सांगितले.
न्यायालयीन लढाईचा निकाल शिंदे यांच्या बाजूने लागणार
सध्या सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईत शिंदे यांची बाजू कायद्याला आणि नीतीला धरून असल्याने हे निकाल त्यांच्याच बाजूने लागणार असे सांगत मी देखील वकील आहे मलाही कायद्याचे चांगले ज्ञान आहे असा टोला लगावला . गेल्या पंधरा दिवसात नवीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ज्या धडाक्यात सर्वसामान्यांसाठी निर्णय घेणे सुरु केले असा एकतारी निर्णय पूर्वीच्या दोघांनी घेतला होता का असा सवाल केला .
इतर महत्वाच्या बातम्या
Shahaji Patil : काय ती झाडी, काय तो व्हायरल कॉल; शहाजीबापूंना कॉल करणारे रफिक भाई म्हणाले...
Shahaji Patil : सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे 'शहाजीबापू' कोण? पाहा त्यांची राजकीय कारकीर्द