Shahaji Patil : काय ती झाडी, काय तो व्हायरल कॉल; शहाजीबापूंना कॉल करणारे रफिक भाई म्हणाले...
शहाजीबापू यांची भाषा सध्या अनेकांच्या तोंडात बसली आहे . काय डोंगार, काय झाडी काय हाटील अशा टिपिकल ग्रामीण ढंगात बोललेले शहाजीबापूंचे संभाषण आता सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Maharashtra Political Crisis : सध्या महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडलं आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. मात्र शहाजीबापूंना हा फोन त्यांचे जवळचे मित्र रफिकभाई यांनी केला होता. आमचा फोन कॉल एवढा व्हायरल होईल वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया रफिकभाईंनी एबीपी माझाशी बोलताना केली.
शहाजीबापू यांची भाषा सध्या अनेकांच्या तोंडात बसली आहे . काय डोंगार, काय झाडी काय हाटील अशा टिपिकल ग्रामीण ढंगात बोललेले शहाजीबापूंचे संभाषण आता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तसे रफिकभाई हे शहाजीबापू यांचे अनेक वर्षांपासूनचे जवळचे मित्र म्हणून सांगोल्यात ओळखले जातात. अचानक शहाजीबापू कोणालाही न सांगता गायब झाले आणि त्यांचा फोनही लागत नसल्याने रफिकभाई यांनी त्यांना संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र फोन बंद असल्याने फोनच लागत नव्हता. रफिकभाईंना काळजी वाटू लागल्यावर अखेर थेट शहाजीबापू यांचा फोन रफिकभाईंना आला आणि काळजी संपली . मात्र हा फोन नेमका कसा रेकॉर्ड झाला आणि कोणी व्हायरल केला याबाबत मात्र रफिकभाईंच्या मनातील कोडे अजून सुटलेले नाही. माझ्याकडे आयफोन असल्याने मी काही तो कॉल रेकॉर्ड देखील केला नाही आणि व्हायरल देखील केला नसल्याचे रफिकभाई सांगतात.
शहाजीबापू हे रांगडे व्यक्तिमत्व असून त्यांची भाषा देखील तशीच रांगडी असल्याने आता सोशल मीडियात याला लाखो लाईक्स मिळत आहे. आता या फोन कॉलवर अनेक मिम्स बनू लागल्या असल्या तरी या फोनमध्ये बापू जे बोलले ते मनापासून असल्याचे रफिकभाई सांगतात. तालुक्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अडचणी वाढत असताना शिवसेनेतून मात्र म्हणावी तशी ताकद शहाजीबापू यांना मिळत नव्हती . प्रत्येकवेळा संघर्ष करूनही तालुक्याला म्हणावा तसा निधी मिळत नसल्याने बापू नाराज असल्याचे रफिकभाई सांगतात .
काही महिन्यांपूर्वी गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांना विधिमंडळात श्रद्धांजली वाहण्याच्या वेळी शहाजीबापू यांनी पक्षाकडे बोलण्यासाठी मागणी केली होती. पण त्यांची ही इच्छा देखील पूर्ण न झाल्याने शहाजीबापू नाराज असल्याचे रफिकभाई सांगत आहेत. आता आमची काळजी मिटली असून बापूनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचेही रफिकभाई यांनी सांगितले .
संबंधित बातम्या :
Memes : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील!' शहाजीबापूंच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर
Shahaji Patil : सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे 'शहाजीबापू' कोण? पाहा त्यांची राजकीय कारकीर्द
Shahaji Patil : सगळं ठरलंय! फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे उपमुख्यमंत्री, तर आम्हाला... शिवसेनेच्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल