एसटी महामंडळातील दीड हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित
कोरोनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. जवळपास दीड हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. सेवा खंडित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक-वाहकांसोबतच सहाय्यक लिपिक, टंकलेखकांचा समावेश आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या एसटी महामंडळाची सेवा कमी प्रमाणात सुरु आहे. याचा फटका एसटीच्या कमाईला बसला आहे. त्यामुळे सध्या कंत्राटी पदावर काम करणाऱ्या 1500 कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. लवकरच टाळेबंदी संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना आम्ही पुन्हा सेवेत घेऊ. कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं नाही तर त्यांची काही दिवसांसाठी सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. सेवा खंडित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक-वाहकांसोबतच सहाय्यक लिपिक, टंकलेखक यांचा समावेश आहे. कामगार संघटनांनी मात्र ही संख्या चार हजारांच्या आसपास असल्याचं म्हटलं आहे.
याबाबत आणखी माहिती देताना शेखर चन्ने म्हणाले की, "एसटी महामंडळाने कोणत्याही कर्मचाऱ्याला काढलेलं नाही. सध्या 1500 कर्मचाऱ्यांची सेवा काही कालावधीसाठी खंडित करण्यात आलेली आहे. हे सर्व कर्मचारी एसटी महामंडळात वेगवेगळ्या विभागात रोजंदारीवर काम करतात. सध्या एसटी महामंडळाची जिल्हातंर्गत सेवा सुरु आहे. त्यामुळे जादा मनुष्यबळाची गरज भासत नाही. एकदा एसटी महामंडळाची सेवा पूर्ववत सुरु झाली की, आम्ही पुन्हा पूर्ववत त्यांना कामावर घेऊ. शेवटी एसटी महामंडळाला देखील कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे."
कोरोना व्हायरसमुळे एसटी महामंडळाची आर्थिक बाजू पूर्णपणे ढसाळली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या एसटी महामंडळाच्या निर्णयाचा कामगार संघटनांकडून निषेध करण्यात आला. या निर्णयाबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, "2019 साली दुष्काळी भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ही भरती करण्यात आली होती. परंतु आता ही सेवा खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची उपासमारी होण्याची शक्यता आहे. शिवाय या निर्णयानुसार अनुकंपावर भरती झालेले तरुण आहेत. त्यांचंही ट्रेनिंग खंडित करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुळात एखाद्या कुटुंबातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात काम करण्याची संधी दिली जाते. अशा परिस्थितीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन टाकणे कितपत योग्य आहे. आता या कर्मचाऱ्यांनी काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. लवकरात लवकर हा निर्णय रद्द करावा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे.
एसटी महामंडळाचा हा निर्णय म्हणजे तुघलकी असल्याची टीका इंटकने केली आहे. याबाबत बोलताना इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले की, "हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा आणि कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावं."
Coronavirus Effect | एसटीचे 4 हजार कर्मचारी बेरोजगार; एसटी महामंडळाचा तुघलकी निर्णय :कामगार संघटना