Serum Institute fire : आगीचे नेमके कारण उद्या स्पष्ट होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार
आग पूर्ण आटोक्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.आग नेमकी कशामुळे लागली हे उद्या स्पष्ट होईल, असे अजित पवार म्हणाले.
पुणे : सीरम इन्स्टिट्यूटमधील आग आटोक्यात आली आहे. आग कशामुळे लागली नाही हे अद्याप कोणालाही सांगता येणार नाही. उद्या दिवस उजडताच यासंबंधी तपास सुरू होणार असून आगीचे नेमके कारण उद्या स्पष्ट होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. सीरम इन्स्टिट्यूच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. उद्या दिवस उजडताच यासंबंधी ऑडिट सुरू होणार आहे, आत पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आग लागल्यानंतर आतील स्प्रिंकल चालू झाले होते, पण आग भडकल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. या आगीत ज्या पाच लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आग विझवण्यासाठी स्थानिक फायर ब्रिगेडच्या जवानांनी चांगले काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली. त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली आहे.
आग लागली त्या ठिकाणी प्रयोगशाळा (लॅब) नव्हती. रोटासाठी लागणारे औषध त्या ठिकाणी तयार करण्यात येणार होते. त्यापूर्वीच आग लागल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
सीरम इन्स्टिट्यूटचा परिसर sez आहे. याठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली का याचाही तपास केला जाईल. वेल्डिंग सुरू असल्यामुळे आग लागली असे सांगण्यात येत आहे. त्याचाही तपास उद्या होईल.आगीचे नेमके कारण उद्या स्पष्ट होईल. Sez च्या नियमांचे योग्यरित्या पालन झाले का? याचा तपास करण्यात येईल. काम करणाऱ्या ठेकेदारालाही बोलवण्यात आले आहे. त्याच्याकडे चौकशी करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर गेले होते. आग तिसऱ्या मजल्यावर लागली. या आगीमागे घातपात असल्याची शक्यता काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यामुळे खरंच असं झालं का याचा तपास केला जाईल. आदर पुनवाला सध्या परदेशात आहेत. आग पूर्ण आटोक्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आग नेमकी कशामुळे लागली हे उद्या स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :