(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Serum Institute Fire | सीरम इन्स्टिट्युटच्या आगीमागे घातपात आहे का? प्रकाश आंबेडकरांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
लस आल्यानंतरच सीरम इन्स्टिट्युटमध्ये आग कशी लागते? यावर संशयाचं वातावरण असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
अकोला : पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला लागलेली आग ही लागली की, लावण्यात आली? याचा शोध राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी या संस्थेत कधी मोठ्या आगीची घटना घडली नाही. मग लस आल्यानंतरच या संस्थेत आग कशी लागते? यावर संशयाचं वातावरण असल्याचं आंबेडकर म्हणालेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या आगीच्या घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शेतकरी कायद्यांविरोधात 27 जानेवारीला 'किसानबाग' आंदोलन
मुस्लिमांनी नागरिकत्व बिलाच्या पार्श्वभूमीवर केलेलं दिल्लीतील 'शाहिनबाग' आंदोलन जगभरात गाजलं होतं. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात याच धर्तीवर मुस्लीम संघटनांच्या पुढाकारानं राज्यात 'किसान बाग' आंदोलन करण्यात येणार आहे. 27 जानेवारी रोजी राज्यभर हे एकदिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे. देशातील शेतकरी अडचणीत असून देशभरातील लाखो शेतकरी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक बिल मागे घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ते आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केला. त्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन असल्याचं आंबेडकर म्हणालेत.
Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीसंदर्भात अदर पुनावालांचं ट्वीट, म्हणाले...
ग्रामपंचायत निवडणुकीत 'वंचित'ची ताकद वाढली
राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तीन हजार 769 सदस्यांनी विजय प्राप्त केल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. राज्यातील 280 ग्रामपंचायतीवर 'वंचित बहुजन आघाडी'ने एकहाती सत्ता मिळवल्याची माहिती यावेळी आंबेडकरांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचा हा मोठा विजय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यभरातील बारा बलुतेदार-अलुतेदार पक्षाशी जुळल्याचं आंबेडकर म्हणाले.