एक्स्प्लोर
चार कोटींच्या विम्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव
नाशिक : नाशिकमध्ये अपघाती मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी एकाने तीन साथीदारांच्या मदतीने सिनेस्टाईल पद्धतीने स्वत:च्याच मृत्यूचा बनाव रचला. मात्र, ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासामुळे त्याचा हा बनाव उघडकीस आला. चौघा संशयितांनी मृतदेहासाठी एका वेटरची हत्या करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर जवळील तोरंगण घाटात फेकून दिला होता.
9 जून 2017 रोजी याच त्र्यंबकेश्वर-जव्हार मार्गावरील तोरंगण घाटात एका दुचाकी चालकाचा अपघाती मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं. त्याच्या वाहनाची तपासणी केली असता मिळालेल्या कागदपत्रांनुसार त्याचं नाव रामदास वाघ असे असून तो चांदवड तालुक्यातील तांगडी शिवारातील असल्याचं समोर आले.
पोलिसांनी त्र्यंबक पोलिस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा दाबून आणि डोक्यावर वार करून हत्या केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवताच मयत हा रामदास वाघ नसून हा सगळा एक मास्टरप्लान असल्याच धक्कादायक वास्तव तपासात समोर आलं.
रामदास वाघ हा एक पॉलिसी एजंट असून तो वादग्रस्त जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. गतवर्षी त्याने विविध कंपन्यांचा 4 कोटी रुपयांचा विमा काढला होता आणि याच विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने आपल्या 3 साथीदारांच्या मदतीने स्वतःच्याच अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता.
या सर्व प्लानसाठी ते एखाद्या परप्रांतीय माणसाच्या शोधात होते आणि अखेर त्यांनी चांदवडच्या एका हॉटेल मध्ये वेटरच काम करणाऱ्या मूळच्या तामिळनाडू येथील असलेल्या मुबारक चांद याच्याशी जवळीक साधली. त्याला 2 दिवस आधीच हॉटेलमधून गायब करत त्याचा त्यांनी पाहुणचार केला आणि 9 जून रोजी रामदासचे कपडे त्यांनी चांदला घातले आणि फिरायला जाण्याचा बहाणा करता त्र्यंबकजवळील तोरंगण घाटात नेऊन त्याला गुंगीचे औषध पाजत सिट बेल्टच्या सहाय्याने गळा आवळून त्यांनी त्याची हत्या केली.
हत्या केल्यानंतर त्यांनी चांदला रस्त्यालगत फेकून देत त्याची ओळख नष्ट करण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरुन चारचाकी गाडीचे चाक फिरवत चेहरा विद्रुप केला आणि रामदासच्या नावावर असलेले लाईट बिल, पॅन कार्ड रामदासच्या नावावर असलेल्या बाईकमध्ये ठेवले. ती बाईक मृतदेहाजवळच टाकून ते इथून फरार झाले. या कामासाठी रामदासने सोबतच्या साथीदारांना वाटे ठरवून दिले होते.
यातील मयत असलेला मुबारक चांद हा चांदवड-देवळा राज्यमार्गावर खेलदरी टोल नाक्याजवळ साहेबराव जाधव यांच्या महाराणा ढाब्यावर गेल्या सात वर्षापासून वेटरचे काम करत होता. तो मूळचा तमिळनाडूच्या सेलम येथील राहणारा होता. अत्यंत शांत आणि कामात प्रामाणिक असलेल्या हा व्यक्ती पाच तारखेला रस्त्यावरील अन्य एका हॉटेलवर बिडी घेण्यासाठी गेला असता तो हॉटेलवर पुन्हा परतलाच नव्हता.
या प्रकरणाचा पोलिसांनी केलेला हा तपास हा सर्वत्रच चर्चेंचा विषय ठरतो आहे. मयत चांदची ओळख पटवण्यासाठी पोलिसांच एक पथक 1800 किमीचा प्रवास करत तामिळनाडूला देखील जाऊन आलं होतं. मात्र, असे असले तरी यातिल मुख्य सूत्रधार रामदास वाघ हा अद्यापही फरार असून त्याचा शोध आता पोलिस कसा घेत आहेत, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement