Satej Patil : लाडक्या बहिणींना वर्षभराचे पैसे आताच द्या, गिरीशभाऊ, तुमचा कोल्हापुरात जाहीर सत्कार करतो: सतेज पाटील
Ladki Bahini Yojana Maharashtra : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देतो असं सरकारने सांगितलं होतं, पण ते कधी देणार याची तारीख मात्र सांगितली जात नाही असं सतेज पाटील म्हणाले.

मुंबई : निवडणुकीच्या आधी पात्र असलेल्या महिला आता अपात्र कशा काय ठरवल्या जात आहेत? जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने त्यावेळी पात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणी आज सावत्र कशा वाटायला लागल्या? असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी विचारला. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार याची तारीख हे सरकार सांगत नाही. लाडक्या बहिणींना पुढील वर्षभराचे पैसे एकत्रित द्या, तुमचा कोल्हापुरात जाहीर सत्कार करतो असं म्हणत सतेज पाटील यांनी सरकारला आव्हानही दिलं.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच चर्चेला आहे. विधानपरिषदेमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी 2100 रुपये याच अधिवेशनात देणार असं सरकारने म्हटलं नव्हतं असं वक्तव्य केलं. तसेच ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांना अपात्र केलं जात आहे असं सांगितलं. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडवली.
ही योजना राजकीय फायद्यासाठी
सतेज पाटील म्हणाले की, "ज्यावेळी ही योजना सुरू झाली होती त्यावेळी राज्य शासनाने 10 जीआर काढले. त्यावेळी ही योजना राजकीय उद्देश ठेऊन सुरू करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालंय. लोकसभेला फटका बसला, त्याचा उतारा म्हणून ही योजना काढली. यांचं लाडक्या बहिणींवर प्रेम नव्हतं. भाऊबिजेला लाडकी बहीण आठवली, त्यावेळी दोन महिन्यांचे पैसे दिले. निकालानंतर ते पैसे तुम्ही थांबवले."
त्यावेळी लाडकी बहीण आणि आता सावत्र का?
सतेज पाटील म्हणाले की, "आज जे निकष सांगितलं जातात ते आधीपासूनच आहेत. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीची होती. स्थानिक ग्रामसेवक, अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार देण्यात आले होते. मग त्यावेळी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी आज अपात्र कशा काय ठरवल्या जातात? त्यांची फसवणूक का केली जात आहेत? त्यावेळी लाडकी बहीण वाटलेली आज सावत्र कशी काय झाली?"
पुढच्या वर्षभराचे पैसे आताच द्या
या राज्यात अशी एकही योजना नाही की ज्याचे पैसे आधीच्या महिन्यात दिले जातात. पण या योजनेचे पैसे फक्त राजकीय फायद्यासाठी देण्यात आले असा आरोप सतेज पाटील यांनी केला. राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाहून सतेज पाटील म्हणाले की, आता जर तुमच्यात ताकद असेल तर पुढच्या वर्षभराचे पैसे एकत्रित, आताच द्या. पुढच्या वर्षभराचे पैसे जर तुम्ही एकत्रित दिले तर कोल्हापुरात तुमचा जाहीर सत्कार करतो.
2100 रुपये कधी देणार?
सरकारने निवडणुकीआधी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न सतेज पाटील यांनी विचारला. 2100 रुपये कधी देणार याची तारीख सरकार सांगत नाही असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

