अजिंक्यतारा कारखान्याकडून दहाव्या दिवसाला ऊसाचे पेमेंट, याला भ्रष्टाचार म्हणायचा? : शिवेंद्रराजे
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना वेळ आल्यावर तो बाहेर काढणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितलं. यानंतर शिवेंद्रराजे आक्रमक झाले.
सातारा : "उदयनराजे जर छत्रपतींच्या विचाराला धरुन काम करतात तर ते लोकसभेला पराभूत का झाले आणि त्याच विधानसभेच्या निवडणुकीत मी का निवडून आलो, याचे उत्तर त्यांनी द्यावे," असे म्हणत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसंच यांचा छत्रपतींचा विचार म्हणजे गाडी उडवून खेळ करणे, गाडीमध्ये म्युझिकचा मोठा आवाज करुन चौकाचौकात रात्रीचे फिरायचे, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला.
नुने विकास सोसायटीच्या निवडणुकीत 13-0 असा पराभव झाल्यानंतर उदयनराजेंनी साताऱ्यातील साबळेवाडी या ठिकाणी विजयी उमेदवारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली होती. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना वेळ आल्यावर तो बाहेर काढणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितलं. यानंतर शिवेंद्रराजे आक्रमक झाले असून उदयनराजे हे गाड्या उडवतात, रात्रीचे फिरतात आणि यांच्याकडे छत्रपतींचे विचार आहेत का असाही प्रश्न विचारला. तसंच सर्टिफिकेशन देण्याचं कॉन्ट्रॅक्ट उदयनराजेंना कोणी दिले, ते काय थोर इतिहासकार आहेत की, विचारवंत आहेत असे म्हणत उदयनराजेंना केंद्र सरकारने सर्टिफिकेशन चालू करा असे सांगितले आहे का असाही प्रश्न त्यांनी विचारला.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणार : उदयनराजे
नुने विकास सोसायटीच्या निवडणुकीबाबत काय म्हणाले?
नुने विकास सोसायटीवर आमची सत्ता कधीच नव्हती. वीस वर्षानंतर निवडणूक लागली. पॅनेलचा कारभार यापूर्वी घरातूनच चालत होता. सोसायटी माझ्या विचाराची नव्हती, असं शिवेंद्रराजे म्हणाले.
अंजिक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर
निवडणुका लागल्या की उदयनराजेंना कारखाना दिसतो. उदयनराजे कारखान्याचे सभासद नाहीत, त्यामुळे कारखान्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. कारखान्यावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला, शासनाने दिला आहे का? असा सवालही शिवेंद्रराजेंनी विचारला. दहाव्या दिवसाला ऊसाचे पेमेट अजिंक्यतारा कारखाना देतं, इतर कोणीच देत नाही, याला भ्रष्टाचार म्हणायचा का? कोविडच्या काळात 18 टक्के बोनस दिला, तोही एकरकमी ही काय भ्रष्टाचाराची व्याख्या म्हणायची का? उदयनराजेंचे वय वाढेल तशी त्यांची बुद्धी कमी व्हायला लागली आहे. आजूबाजूचे बगलबच्चे त्यांना योग्य माहिती पुरवत नाहीत. त्यांनी जरा अभ्यास करावा, असं शिवेंद्रराजे म्हणाले.
उदयनराजेंचा छत्रपतींचा विचार म्हणजे गाडी उडवून खेळ करणे : शिवेंद्रराजे
शिवेंद्रराजे छत्रपतींच्या विचाराला धरुन वागत नाहीत असे उदयनराजे म्हणाले होते. त्यांना उत्तर देताना शिवेंद्रराजे म्हणाले की, "सर्टिफिकेशन देण्याचं कॉन्ट्रॅक्ट उदयनराजेंना कोणी दिले, ते काय थोर इतिहासकार आहेत की विचारवंत आहेत, की केंद्र सरकारने त्यांना गॅजेट करुन दिले आहे, तुम्ही सर्टिफिकेशन चालू करा. उदयनराजे जर छत्रपतींच्या विचाराला धरुन जर काम करतात तर ते लोकसभेला पराभूत का झाले आणि त्याच विधानसभेच्या निवडणुकीत मी का निवडून आलो, याचे उत्तर त्यांनी द्यावे. यांचा छत्रपतींचा विचार म्हणजे गाडी उडवून खेळ करणे, गाडीत म्युझिकचा मोठा आवाज करुन रात्रीचे चौकाचौकात फिरायचे.
ते पुढे म्हणाले की, "उदयनराजे आणि त्यांच्या घरातील सदस्य अजून सतराव्या शतकातून बाहेर पडलेले नाहीत. राजे आणि रयत कधीच संपले. आज लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सर्व जनता आहे. अजूनही ते सतराव्या शतकातच आहेत. त्यांनी माणसात यावे."
उदयनराजेंना सातारकर साथ देणार नाहीत : शिवेंद्रराजे
उदयनराजेंनी नगरपालिकेतील अपयश दिसत आहे. त्यांना माहिती आहे सातारकर आता साथ देणार नाहीत. त्यांचे आजपर्यंतचे राजकारण छत्रपती छत्रपती म्हणूनच सुरु आहे. नाक्यावर पैसा खर्च केला, (ग्रेड सेफ्रेशन) सातारकरांना एक रुपयाचाही फायदा नाही. कासच्या कामात यांचा काडीचाही संबध नाही. माझ्या पत्रावर अजितदादांनी बैठक लावली, एकच झाले की त्यावेळी नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती आणि तलाव नगरपालिकेच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी नारळ फोडला आणि आम्ही केले असे म्हणायचे. यांच्या ढिसाळ कारभारामुळे ते काम अडकले आणि नंतर मीच अजितदादांजवळ बैठक लावली आणि थांबलेले काम पुन्हा सुरु झाले.
'सातारकरांचे यांना काहीही देणे-घेणे नाही'
हद्दवाढ राहावी यासाठी मी प्रयत्न केले. पंचायत समिती आणि जिल्हापरिषद सदस्य पद राहावे यासाठी हद्दवाढ थांबवली होती. दोन वर्ष होऊ दिले नाही. सातारकरांचे काहीही यांना देणे घेणे नाही, त्यांचे बगलबच्चे, कॉन्ट्रॅक्टर हेच त्यांचे राज्य आहे, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका केली.