Bhandara Hospital Fire | आज 'तिथे' सविता इखर असत्या तर ..
भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे (Bhandara Hospital Fire) दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशाच प्रकारची दुर्घटना 2019 साली नागपूरात घडली होती. पण त्यावेळी अधिपरिचारिका सविता इखर (Savita Ikhar) यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नऊ नवजात बालकांना वाचवलं होतं.
मुंबई: सविता इखर (49), या अधिपरिचारिका म्हणून इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे कार्यरत आहे. खरं तर सर्वसामान्यांना हे नाव माहिती असण्याचे कारण नाही. मात्र आज त्यांची प्रकर्षाने आठवण होते ती त्यांनी केलेल्या असाधारण कर्तृत्वामुळे. 31 ऑगस्ट 2019 च्या मध्यरात्री त्या रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असताना तेथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखून धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता नऊ नवजात शिशुना बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं. हे सर्व शिशु 1 ते 15 दिवसाच्या आतील होते.
भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.प्राथमिक दृष्ट्या ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात असले तरी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाविरोधातील लसीकरणाची चर्चा सुरु असताना आरोग्य क्षेत्राला हादरुन सोडणारी ही घटना आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सध्या तरी धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात आलं आहे.
Bhandara Hospital Fire | आमची लेकरं गेली.... ; मृत बालकांच्या मातांचा आक्रोश
नागपूरमध्ये अशीच घटना
31 ऑगस्ट 2019, ला इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे मध्यरात्री त्या रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागली. त्यावेळी सविता इखर या कामावर हजर होत्या. त्यांना ही घटना कळताच त्यांनी तात्काळ मोठी हानी टाळण्यासाठी ऑक्सिजनचे जंबो सिलेंडर बंद केले. शिवाय लहान बाळांना बाहेर काढत असताना त्यांनी बाळाचे ओळख पटणारे बॅचदेखील सुरक्षितपणे ठेवले.
जी मुले ऑक्सिजनवर नव्हती अशा चार मुलांना दोन्ही हातात घेऊन त्यांना प्रथम बाहेर काढले. या दरम्यान त्यांनी अनेकांना मदतीची हाक मारली. मात्र त्यांच्या मदतीला कोणी यायच्या आत सविता इखर यांनी परत आतमध्ये जाऊन अन्य पाच बलकांना सुखरूप बाहेर काढले. त्यापैकी एक बाळ केवळ दोन तासचंच होतं, त्याचे वजन 700 ग्रॅम इतकं होतं. दुर्दैवानं ते बाळ दुसऱ्या दिवशी दगावलं. इखर यांनी त्यावेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते.
इखर 2003 सालापासून शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी पासून त्या 1993 पासून शुश्रूषा सेवेत कार्यरत आहे. भंडाऱ्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इखर यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले कि, " खरंच ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. अशा प्रसंगाला मी सुद्धा सामोरे गेलेली आहे. नागपूरची घटना जेव्हा घडली तेव्हा मी कशाचाही विचार न करता त्या बाळांना सुखरूप बाहेर काढलं होतं. आगीच्या ठिणग्या या दरवाजावर पडत असताना मी तेथून ये-जा करीत होते. अधिपरिचारिका जेव्हा कामावर असतात आणि विशेष करुन लहान बाळांचा अतिदक्षता विभागाच्या ठिकाणी काम करत असताना कायम 'अलर्ट' असतात. आम्ही आमच्या मुलांचे संगोपन जेवढं करत नाही तेवढं संगोपन या बाळाचं करता असतो. ते आमचे काम आहे आणि आम्ही ते चोखपणे बजावण्याचा प्रयत्न करत असतो. मला आज खूप आनंद आहे कि त्या नऊ बाळांना मला सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यातील एक बाळ दुसऱ्या दिवशी दगावले."
त्या पुढे असेही म्हणतात की, "भंडारा येथील घटनेत नेमकी परिस्थिती कशी होती, हे येथून आपल्याला सांगता येणार नाही. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या अधिपरिचारिकेनेसुद्धा त्या दुर्घटनेतून बालकं वाचावीत म्हणून साहजिकच सर्वतोपरी प्रयत्न केले असणारच. कारण आम्हाला सेवेत असताना अशा घटना घडल्या तर कशा पद्धतीने त्या आगीवर नियंत्रण आणायचे याची माहिती दिलेली असते. सगळेच जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने हे प्रयत्न करत असतो. प्रसंगावधान राखून अशावेळी निर्णय घेणे अपेक्षित असते."
भंडारा येथील घटनेनंतर राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत असणाऱ्या सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा स्तरावरील. शासकीय रुग्णालयातील फायर सेफ्टी ऑडिट अधिक सक्षमपणे कसे करता येईल याचा विचार करावा लागणार आहे.
भंडारा घटनेची चौकशी करणार: राजेश टोपे
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून भंडारा दुर्घटना याबाबतीतील माहिती देणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, नवजात शिशु अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे प्रथम दर्शनी सांगितले जात आहे. मध्यरात्री या विभागात आग लागल्यामुळे मोठया प्रमाणात काळा धूर निर्माण झाला. त्यावर कर्तव्यावर असणाऱ्या अधिपरिचारिका आणि वॉर्ड बॉय यांनी या विभागाच्या दरवाजा खिडक्या उघडल्या फायर एस्टींगेस्वरच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याचवेळी लगतच्या वॉर्डमध्ये सुद्धा धूर पसरला होता. सर्व मदतीचे प्रयत्न करून या ठिकाणावरून 17 बालकांना बाहेर काढण्यात आले, मात्र त्यापैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले आणि 10 बाळांचा या मध्ये दुर्दैवी अंत झाला. तसेच राज्य सरकारकडून दुर्घटनेतील पिडीत कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितले.
पहा व्हिडीओ: Bhandara Hospital Fire | 'या' सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले 7 चिमुकल्यांचे प्राण
Bhandara Hospital Fire update : पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत : राजेश टोपे