(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena : ठाकरेंकडून धनुष्यबाण आणि शिवसेना निसटली, संजय राऊत म्हणाले...
Shiv Sena : शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
Shiv Sena : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर शिंदे गटाचा दावा मान्य करण्यात आला आहे. मागील सहा दशकांपासून ठाकरे आणि शिवसेना हे नातं आता संपुष्टात आल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा खोक्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. हा निकाल विकत घेतल्याची बोचरी टीका राऊत यांनी केली.
कोकण दौऱ्यावर असलेले संजय राऊत यांनी सांगितले की, 'सत्यमेव जयते' ऐवजी आता 'असत्यमेव जयते' असं करावं. खोक्यांचा कुठंपर्यंत वापर झाला हे या प्रकरणातून दिसून येत आहे. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठं गेला हे लोकांनी पाहिला आहे. शिवसेना प्रमुख, शिवसैनिकांच्या त्यागातून पक्ष उभा केला. तो पक्ष 40 बाजारबुणगे पक्ष विकत घेतात याची नोंद होणार आहे. निवडणूक आयोगाने आता लोकांचा विश्वासही गमावला असल्याची टीका राऊत यांनी केली. स्वायत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहे, हे दिसून येत आहे. निवडणूक आयोग असेल किंवा मग तपास यंत्रणा असेल हे कोणाच्यातरी गुलाम असल्यासारखं वागत आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, महाराष्ट्रातून शिवसेना संपवावी यासाठी सगळा डाव रचला जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
आम्ही लोकांमध्ये जाणार असून लोकांमधून पुन्हा एकदा शिवसेना उभी करणार असल्याचा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि नवीन निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जाऊ असेही राऊत यांनी म्हटले.
आयोगाने निर्णय देताना लक्षात घेतलेले मुद्दे :
1. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला अपात्रतेचा निर्णयाची कक्षा तसंच ही सुनावणी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रलंबित असणे या बाबी आणि निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्हाबाबतच्या असणाऱ्या तरतूदी या वेगळ्य़ा बाबी.
2. शिवसेना पक्षात फूट पडली
3. बहुमताची चाचणी आणि संघटनेतील बहुमत याचाही विचार.
4 .२०१८ साली झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड प्रतिनिधी सभेने केली होती त्यामुळे संघटनेत ठाकरे गटाला बहुमत आहे हा मुद्दा ग्राह्य धरला गेला नाही.
5. त्यामुळे निवडणुकीत कोणत्या गटाला किती मतं मिळाली या मुद्द्यावर भर
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी झालेल्या उमेदवारांना पडलेल्या 47 लाख 82 हजार 440 मतांपैकी शिंदे गटाच्या 40 आमदारांना 76 टक्के म्हणजे 36 लाख 57 हजार 327 मतं पडली होती. या तुलनेत ठाकरे गटाच्या15 आमदारांना अंदाजे 24 टक्के म्हणजे 11 लाख 25 हजार 113 मतं पडली होती. तसंच शिवसेनेला एकूण मिळालेल्या 90 लाख 49 हजार 789 मतांपैकी शिंदे गटाला 40 टक्के तर ठाकरे गटच्या 15 आमदारांना 12 टक्के मतं आहेत.
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.