अनेक गोष्टीप्रमाणे लालबागचा राजाही हे लोक गुजरातला नेऊ शकतात; गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊतांचा टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून मुंबईच्या दौऱ्यावर आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री मुंबईला येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी अमित शाहांवर निशाणा साधलाय.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते लालबागच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. त्यांनी यावं, मात्र मला सारखी भीती वाटते आहे की, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी पळवले, राज्यातील अनेक संस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) देखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका मला आहे. कारण हे लोक काहीही करू शकतात. एकीकडे लालबागचा गणपती प्रख्यात आहे. देश विदेशातून लोक तेथे येत असतात. त्यामुळे लालबागचा राजा हे गुजरातला देखील घेऊन जातील, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून पुढील दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री मुंबईला येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी अमित शहांवर निशाणा साधत टीका केली आहे.
महाराष्ट्राची जनता गृहमंत्ऱ्याना महाराष्ट्राचा शत्रू मानते
राज्यातील अनेक प्रकल्प, व्यापार, उद्योग आणि महत्त्वाची केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. आज ते देशाचे गृहमंत्री आहत, मात्र ते कमजोर गृहमंत्री आहेत. एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. तर देशात जम्मू-काश्मीर, मणिपूर असेल किंवा देशातील इतर भाग असतील इकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लूटमार याला त्यांचा पाठिंबा आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी सारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करणे हे एका गृहमंत्र्यांचे काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुबळा करायचा त्यांच्या प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ते वारंवार महाराष्ट्रात येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना महाराष्ट्राचा शत्रू मानते. असेही संजय राऊत म्हणाले.
गृहमंत्र्यांच्या कामाची इतिहासात नोंद होईल
मी अतिशय विचारपूर्वक बोलत असून हे लोक व्यापारी लोक आहेत. महाराष्ट्राला हे लोक दुश्मन मानतात. तसेच बरेचसे राज्य असे आहेत जे यांना लुटायचे आहेत. मात्र गृहमंत्र्यांचे काम आहे की सर्वांना समान न्याय द्यावा. कायदा सुव्यवस्था राखवं, मात्र त्यांचे काम पक्ष फोडणे, एकमेकांवर दबाव टाकणे, न्यायालयावर दबाव टाकणे, इत्यादी कामे गृहमंत्र्यांची नाही. त्यांच्या या कामाची इतिहासात नोंद होईल. महाराष्ट्र लुटण्यासाठी, तोडण्यासाठी ते वारंवार महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. महाराष्ट्राची प्रगती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा त्यांच्या डोळ्यात खूपत आहे.
गेल्या लोकसभेत राज्यात जे निकाल हाती आले, जनतेने जो कौल दिला आहे, हे बघता त्यांना महाराष्ट्र अधिक कुमकुवत करायचा आहे. म्हणूनच ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाही आहे. खरंच यांच्यात हिंमत असेल तर हरियाणा सोबत राज्याच्या निवडणुका घेतल्या पाहिजेल. असा घनाघातही संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या