शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली तीन कायदे केंद्र सरकार लादू पाहतंय : राजू शेट्टी
शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे आणि शेतकरी ताकदीनं आंदोलन करत आहेत. एवढ्या मोठ्या शक्तीशाली केंद्र सरकारसमोर शेतकरी एकाकी लढतोय, असं राजू शेट्टी म्हणाले.
सांगली : मुंबई शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' धडकलंय. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी आज मुंबईत एकवटलेत. आज शेतकऱ्यांचा हा मोर्चा राजभवनावर जाणार आहे. अशातच मुंबईसोबतच सांगलीतही शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात सांगली-कोल्हापूर असा हा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. यानिमित्ताने राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.
राजू शेट्टी म्हणाले की, "आम्ही कोणाच्याही पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केलेली नाही. कारण गेल्या जून महिन्यापासून आम्ही सातत्यानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात आम्ही लढतोय. यासंदर्भात पहिला अध्यादेश जून महिन्यात निघाला, तेव्हापासून आम्ही सातत्यानं या तीनही कायद्यांना सातत्यानं विरोध करतोय. या आंदोलनासाठी कुणी पाठिंबा देईल किंवा कोणत्याही राजकीय पक्षाकडून ताकद मिळले अशी अपेक्षाच ठेवली नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी विरोधी पक्षावर नाराज आहे. संपूर्ण देशातील शेतकरी एवढं मोठं आंदोलन करत असताना ज्या ताकदीनं विरोधी पक्ष या आंदोलनात सहभागी होणं अपेक्षित होतं, पण काही फुटकळ वक्तव्य वगळता फारसं काही या विरोधी पक्षांनी केलेलं नाही."
"शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे आणि शेतकरी ताकदीनं आंदोलन करत आहेत. एवढ्या मोठ्या शक्तीशाली केंद्र सरकारसमोर शेतकरी एकाकी लढतोय", असंही राजू शेट्टी म्हणाले. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या 9 फेऱ्या निष्फळ ठरल्या यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "यामध्ये चर्चा करण्यासारखा मुद्दाच नाहीये. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली तीन कायदे सरकार लादू पाहतंय. असे कायदे लागू करा किंवा अशाप्रकारचं धोरण राबवा म्हणून कोणी मागणी केलेली होती? कोणत्या शेतकरी संघटनेनं मागणी केलेली होती? कोणीच अशी मागणी केली नव्हती. जी मागणी केली जातेय, ती तुम्ही पूर्ण करत नाही."
पाहा व्हिडीओ : विरोधकांवर नाराज; शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला नाही : राजू शेट्टी
"शेतकऱ्यांची खरी मागणी काय आहे, स्वामिनाथन यांच्या सुत्राप्रमाणे भाव द्या. आणि जो भाव देताय तो जसा ऊसाचा हमीभाव कायदेशीरित्या बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे ऊसाचा हमीभाव हा कायदेशीर रित्या बंधनकारक असला पाहिजे. त्यापेक्षा कमी किमतीत जो कोणी खरेदी करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे, अशी मूळ मागणी आहे. त्याकडे सरकार लक्षच देत नाही. जे मागितलंच नाही, ते या कॉर्पोरेट हाऊससाठी, उद्योगपतींसाठी तुम्ही आमच्यावर लादताय, ते पहिल्यांदा मागे घ्या." असं राजू शेट्टी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "यावर चर्चा कसली करताय. चर्चा करुन केवळ वेळ काढायचा, शेतकऱ्याला रमवायचं. त्यांना असं वाटतं की, एवढे व्याप सोडून शेतकरी किती दिवस रस्त्यावर बसेल, एक दिवस दमून जाईल. म्हणून सरकार वेळ काढायला लागलंय."
महत्त्वाच्या इतर बातम्या :