Sammruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते दिवाळीतच?
Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाची वारंवार तारीख जाहीर होऊनही उद्घाटन न झाल्यामुळे यावेळी सरकारकडून या तारखेबद्दल गोपनीयता पाळण्यात येत आहे.
Samruddhi Highway : शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) राज्यातील जनतेला दिवाळीला गिफ्ट देण्याची शक्यता आहे. कारण नागपूर - मुंबई असा 701 किलोमीटर 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या' (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार असल्याची चर्चा होती. मात्र अनेकदा लोकार्पणाची तारीख जाहीर होऊनही लोकार्पण न झाल्यामुळे यावेळी सरकारकडून या तारखेबद्दल गोपनीयता पाळण्यात येत आहे. पंतप्रधानांनी वेळ दिल्यावरच मुख्यमंत्री कार्यालयाकडून तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दिवाळीला एक दिवस अगोदर म्हणजे येत्या 23 ऑक्टोबर रोजी हा लोकार्पण सोहळा नागपुरात होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ आणि तारीख मिळाल्यानंतरच मात्र लोकार्पण होणार हे नक्की आहे. मात्र पाऊस आणि अन्य कारणांमुळे लोकार्पण पुढे ही ढकलण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरु करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. परंतु नेहमी लोकार्पणाच्या कामात अडचणी आल्या आहेत. अनेकदा कामाचा दर्जा, काम सुरु असताना झालेल्या दुर्घटना यांमुळे समद्धी महामार्गाचं उद्घाटन कायम पुढे पडत गेलं. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अजूनही हा महामार्ग खुला करण्यात आलेला नाही. एकूण 16 टप्प्यांत या महामार्गाचं बांधकाम सुरू असून एकंदरीत नागपूर मुंबई या 701 किलोमीटरच्या महमार्गात एकूण 1699 ठिकाणी छोटी मोठी बांधकामं असून यातील जवळपास 1400 च्यावर बांधकामं पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणचं काम अद्याप शिल्लक आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिसूचनेत वेगमर्यादा 120 किमी एवढी निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.