(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण दिवाळीत होण्याची शक्यता
Samruddhi Highway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन दिवाळीत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार असल्याचं कळतं.
Samruddhi Highway : शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील जनतेला मोठं दिवाळी गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचं उद्घाटन दिवाळीत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार असल्याचं कळतं. याआधी 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार असल्याची चर्चा होती. परंतु हा मुहूर्त देखील लांबणीवर पडला असून आता दिवाळीत पहिला टप्प्याचं लोकार्पण होईल, असं म्हटलं जात आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. याच समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये येणार आहेत. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. त्याचंच उद्घाटन दिवाळीत होणार आहे. या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.
लोकार्पणासाठी तारीख पे तारीख
महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरु करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली होती. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्याची माहिती आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याचं कळतं
समृद्धी महामार्गाविषयी सर्वकाही
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग
- मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं.
- सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे.
- समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई!
- जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.
- समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.
- महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे.
- प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष.
- महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे.
- जवळपास 50 पेक्षा जास्त उड्डाणपुल, 24 हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच 5 बोगदे प्रस्तावित आहेत.
- हा महामार्ग खाजगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे
- युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ती दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.
- समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे काम करणार आहे. तब्बल 25 लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे.
- या प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी पन्नास हजार एकर जमीन लागणार आहे.