(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे पुन्हा कोर्टात, वानखेडेंच्या भावाकडून मलिकांविरोधात वाशिम कोर्टात अर्ज
Washim News : वाशीमच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आपल्या भावाकडून दिलेल्या तक्रारीवरून अट्रॉसिटीनुसार नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अस प्रतिज्ञापत्र आज सादर केले आहे .
वाशीम : राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिकांच्या (Nawab Malik) अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. एनसीबी मुंबईचे माजी विभागीय आयुक्त समीर वानखडे (Sameer wankhede) आणि ज्ञानदेव वानखडे हे मुस्लीम असून खोटे जात प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळविल्याचा आरोपानंतर राज्यात मोठी खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणातून निर्दोषमुक्त झाल्यानंतर समीर वानखडे यांनी आता वाशीमच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आपल्या भावाकडून दिलेल्या तक्रारीवरून अट्रॉसिटीनुसार नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अस प्रतिज्ञापत्र आज सादर केले आहे .
नवाब मलिक आणि वानखडे कुटुंबियातील आरोप प्रत्यारोपामुळे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वातावरण चांगलच तापल होते. मात्र या प्रकरणाला टोकाचो वळण का लागले तर त्याची पार्श्वभूमी म्हणजे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणी समीर वानखडे यांनी केलेल्या कारवाईमुळे जेलची हवा खावी लागली. जावयाची सुटका होताच नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखडे आणि समीर वानखडे हे मुस्लीम असून बनावट दस्तावेजद्वारे नोकरी मिळविल्याचा आरोप केला. त्यानंतर SIT ची चौकशी देखील झाली मात्र त्यात फार काही हाती लागले नाही.
वानखडे कुटुंबीय मूळचे वाशीमच्या वरुड तोफा गावचे आहे. कुटुंबियांना आणि गावातील मित्रमंडळीना भेटण्यासाठी समीर वानखडे गावी आले असता आपल्या भावाने दिलेली तक्रार ही माझी व माझ्या कुटुंबियाची बदनामी करणारी आहे. मी जातीने हिंदू आहे आणि माझ्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार मलिक यांच्यावर अट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी समीर वानखडे यांनी केली आहे.
समीर वानखडे यांच्या कुटुंबाची झालेल्या बदनामी आणि मानसिक त्रासापोटी भाऊ संजय वानखडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली. मात्र तक्रार न घेतल्याने न्यायालयात दाद मागितली होता. मात्र मलिक यांनी वाशीम न्यायालयातील प्रकरण घेऊ नये अशी मागणी केली. त्याच अनुषंगाने प्रकरण वाशीमच्या न्यायालयात चालावे आणि गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी केल्याचे वकील उदय देशमुख यांनी सांगितले आहे.
शेवटी न्यायालायाने प्रकरण आणि शपथपत्र दाखल करून घेतले असून 17 सप्टेंबर रोजी प्रकरणावर तारीख दिली आहे. न्यायालय नक्की न्याय देईल अशी अपेक्षा समीर वानखडे यांनी व्यक्त केली. मात्र आधीच ईडी कोठडीत असलेले नवाब मलिकांची सुटका झाली तरी मात्र समीर वानखडे प्रकरण त्यांना चांगलच भोवणार आहे .