Sambhaji Bhide : गुरुजी म्हणताय, पुरावा आहे का?: पृथ्वीराज चव्हाणांचा प्रश्न; फडणवीस म्हणाले, तुमचं नाव पृथ्वीराज बाबा कसं पुरावा मागू का?, विधानसभेत गदारोळ
ज्या व्यक्तीला तुम्ही गुरुजी म्हणतात त्याचा पुरावा काय आहे, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे, आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे, बाबा कसं आलं याचा पुरावा मागू का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Uproar Over Sambhaji Bhide : महात्मा गांधी यांच्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात संभाजी भिडेंविरोधात (Sambhaji Bhide) सध्या राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. संभाजी भिडेंच्या अटकेसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत गदारोळ केला. संभाजी भिडेंविरोधात विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी केल्याने विरोधकांनी गोंधळ सुरु केला. त्यावर संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, तुम्हाला (विरोधकांना) काय हरकत आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं. तसंच संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात, गडकिल्ल्यांसाठी काम करतात, मात्र महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेतच संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भिडे यांना असेल तिथून उचलून अटक केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
गुरुजी म्हणताय, पुरावा आहे का?: पृथ्वीराज चव्हाण
संभाजी भिडे बोगस माणूस आहे. अनेक ठिकाणी जाऊन राज्यातील समाजसेवक आणि देव देवतांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो आणि हा माणूस मोकाट फिरत आहे. भिडे मुक्तपणे वावरत आहे त्याला पोलीस संरक्षण दिले आहे. ज्या अर्थी सरकार कुठलीही कारवाई करत नाही त्यामागे पोलिसांचे संरक्षण त्याला मिळालेलं आहे. या माणसाला एवढं संरक्षण कसे मिळते निवडणुकीला फायदा करुन घेण्यासाठी हे उद्योग सुरु नाहीत ना? ज्या व्यक्तीला तुम्ही गुरुजी म्हणतात त्याचा पुरावा काय आहे, ते पीएचडी झाले त्याचा काही पुरावा आहे का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला.
पृथ्वीराज बाबा कसं याचा पुरावा मागू का? : देवेंद्र फडणवीस
पृथ्वीराज चव्हाणांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. "त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे, बाबा कसं आलं याचा पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का, त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच भिडे यांना कोणतीही सुरक्षा पुरवली नसल्याचे फडणवीस म्हणाले.
संभाजी भिडेला राजाश्रय, महाराष्ट्रात दंगली घडाव्यात अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीते जितेंद्र आव्हाड म्हणाले, भिडेंबद्दल आज चर्चा झाली, पण जास्त झाली नाही. महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याविषयी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. पंडित नेहरु यांचा काही योगदान देशासाठी नव्हतं त्यांचं कुटुंब मुसलमान होत असे भिडे म्हणाले. एवढंच नाही तर 15 ऑगस्ट हा भारताचा स्वतंत्र दिन नाही असेही ते म्हणाले. अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला हे सगळ्यात मोठे समाजसुधारक म्हणतात. वादग्रस्त वक्तव्यांनंतर देखील अटक होत नाही. संभाजी भिडेला राजाश्रय मिळाला आहे. महाराष्ट्र हातातून जात असताना दंगली घडाव्यात अशी त्यांची इच्छा असावी म्हणून त्यांना पाठिशी घातलं जात असेल. भिंडेची स्वतः ठाण्याला तक्रार केली आहे.
संभाजी भिडेंची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही थांबता थांबत नाही. आधी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, त्यानंतर आता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे वडील मुस्लीम होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. या प्रकारानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताप व्यक्त करुन संभाजी भिडे यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करुन गुन्हे दाखल झाले आहेत.
हे ही वाचा :
Sambhaji Bhide: 'भिडे संभाजीनगरातून परत कसा जातो पाहतोच..'; ठाकरे गटाचा थेट इशारा