Sada Sarvankar : सदा सरवणकरांचा सेनेविरोधात दुसऱ्यांदा बंड, दोनच दिवसात भूमिका बदलून शिंदे गटात सामिल
Sada Sarvankar : मुंबईत एकनाथ शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करणारे सदा सरवणकर यांनी दोन दिवसांनी थेट शिंदेंच्या गटाची गुवाहाटीत गळाभेट घेतली पण सरवणकरांचं हे दल बदलणं नवीन नाही
मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी सात आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यासह काही आमदार आज गुवाहाटीत दाखल झाले आहेत. 21 जूनला मुंबईत एकनाथ शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करणारे सदा सरवणकर यांनी दोन दिवसांनी थेट शिंदेंच्या गटाची गुवाहाटीत गळाभेट घेतली पण सरवणकरांचं हे दल बदलणं नवीन नाही.
2005 साली नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात दंड थोपटले. तेव्हापासूनच सदा सरवणकर यांचा कल हा राणेंकडे राहिला. त्यांच्या याच दुहेरी भूमिकांमुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि आदेश बांदेकरांना दादरमधून उमेदवारी मिळाली. तिथेच सरवणकर रुसले आणि शिवसेना सोडून बसले. पण कालांतराने 2014 साली त्यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधलं आणि दादरमधून आमदार झाले.
पण सदा सरवणकर यांचं शिंदेसेनेमध्ये सामील होणं हे शिवसेनेसाठी जिव्हारी लागणारं आहे. कारण सरवणकर हे शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनाच्या मतदारसंघातून आमदार आहेत. कदाचित म्हणूनच आज दादरमधल्या शिवसैनिकांनी सदा सरवणकरांच्या पोस्टरला काळं फासलं आहे.
सदा सरवणकर उद्धव सेनेतून फुटून एकनाथ सेनेत दाखल झाले आहेत. गेल्यावेळी ते राणेसेनेत दाखल झाले होते पण त्यांचं बंड हे पाच वर्षात शमलं आणि हाती शिवबंधन आलं आहे. आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार? हे येत्या काळात पाहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या: