Sachin Vaze Case | सचिन वाझेंना नियुक्ती दिली नसती तर ही वेळच आली नसती; ख्वाजा युनुसच्या आईचा आरोप
अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एएनआयकडून अटक करण्यात आली आहे. अशातच घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी परभणीचा तरुण ख्वाजा युनुसला अटक करण्यात आली होती. त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर 4 जणांविरोधात ख्वाजाच्या कुटुंबाचा लढा 18 वर्षांपासून सुरु आहे. ख्वाजा युनुसची आई आसिया बेगम यांनी एबीपी माझाला एक्स्ल्युझिव्ह मुलाखत दिली आहे.
परभणी : 2002च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी परभणीचा तरुण ख्वाजा युनुसला अटक करण्यात आली होती. त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला असताना तपासा दरम्यान मृत्यू झाल्याचे मुंबई पोलिसांनी दाखवले होते. मात्र ख्वाजाच्या कुटुंबाने पुराव्यानिशी या विरोधात न्यायालयीन लढा लढला आणि पोलीस कस्टडीतच त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर 4 जणांविरोधात ख्वाजाच्या कुटुंबाचा लढा 18 वर्षांपासून सुरु आहे. मात्र खटला सुरु असताना सरकारने त्याला जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस विभागात नियुक्ती दिली होती. या विरोधात ही ख्वाजाच्या कुटुंबाने सरकारने ही नियुक्ती करून आमच्यावर अन्याय केलाचा आरोप करत या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. वाझेंना ती नियुक्ती दिली नसती तर हिरेन परिवारावर ही वेळ आली नसती. सरकारने त्याला पाठीशी घातल्यानेच त्याचे मनोबल वाढले आहे. सचिन वाझे आणि इतर 4 कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईन, अशी प्रतिक्रिया ख्वाजा युनूसच्या आई आसिया बेगम यांनी दिली आहे.
आसिया बेगम यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, "आमची सरकारला विनंती आहे की, ख्वाजा युनूसचे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे, सचिन वाझे आणि इतर जे पोलीस अधिकारी त्यांनी जे सेवेत घेतलेत त्यांना सेवेतून बरखास्त करून त्यांना फाशी देण्यात यावी, कारण ते ख्वाजा युनूसचे मारेकरी आहेत. मात्र त्यांना शिक्षा द्यायची सोडून त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले आहे. हे सरकारचं बरोबर नाही. आमची लढाई अजुन सुरुच आहे. न्यायालयावर आम्हाला विश्वास आहे. सरकारवर विश्वास नाही." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "सचिन वाझे यांना जर पुन्हा पोलीस दलात नियुक्त केलं गेलं नसतं तर हे प्रकरण झालं नसतं. जेव्हा जेव्हा आम्ही न्यायालयीन तारखेला जातो तेव्हा तेव्हा सचिन वाझे हे पोलिसांना धमकावून दबाव टाकायचे. त्यामुळे आम्हाला न्यालयालाच्या तारखांवर तारखा दिल्या जातात. सरकार वाझे यांची साथ देतंय सरकारच हे बरोबर नाही. 18 वर्ष झाले आमचा लढा सुरु आहे. आमच्या कुटुंबाची खूप वाईट अवस्था झाली याकाळात. ख्वाजाच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले मला विविध आजारांनी ग्रासले. ख्वाजा हा अभियंता होता. त्याला 1 लाख पगार होता. तो आज असला असता तर चित्र वेगळे राहिला असतं."
आसिया बेगम म्हणाल्या की, "आम्ही न्यायालयीन लढा लढला तेव्हा 3 वर्षांनी तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केलं की, ख्वाजाचा मृत्यू हा पोलीस कोठडीतच झाला. तेव्हाच हे प्रकरण निकाली लागायला पाहिजे होतं. मात्र लागले नाही. आमच्या प्रकरणात एकूण 18 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते. यातील सचिन वाझे आणि इतर 3 जण सोडून सर्वजण निर्दोष सुटले. अजुनही हे प्रकरण न्यायालयात आहे. मला न्यायालयावर आणि देवावर पूर्ण विश्वास आहे. मात्र सरकारवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे माझी लढाई ही उच्च न्यायालयात जर न्याय मिळाला नाही, तर सर्वोच न्यायालयापर्यंत सुरुच राहील. मी जिवंत असेपर्यंत सचिन वाझे आणि इतर 3 जणांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी लढतच राहील." असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
कोण होता ख्वाजा युनुस?
नाव : ख्वाजा युनूस सय्यद ख्वाजा अय्युब
शिक्षण : B.E in Instrumentation
10वी पर्यंत परभणी शहरातील बाल विद्या मंदिर येथे शिक्षण
12वी परभणी शहरातील जाकीर हुसेन महाविद्यालयात पूर्ण केली
इंजिनिअरिंग औरंगाबादच्या MIT महाविद्यालयात
शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी दुबई गाठली
सुट्टी घेऊन डिसेंबर 2002ला घरी परतला होता.
या प्रकरणातील आजवरचा घटनाक्रम :
2 डिसेंबर 2002 ला घाटकोपरमध्ये बॉम्बस्फोट झाला.
24 डिसेंबरला अमरावतीच्या चिखलदरा येथून त्याला अटक करण्यात आली.
27 डिसेंबरला कोर्टात हजर करण्यात आले.
औरंगाबाद येथे तपासासाठी घेऊन जाताना पोलिसांच्या जिप्सीचा अपघात झाला आणि तो पळून गेल्याचा पोलिसांनी दावा केला.
जानेवारीमध्ये ख्वाजा युनूसचे कुटुंबीय न्यायालयात गेले.
7 जानेवारीला 2003ला ख्वाजाचा मृत्यू लॉकअपमध्ये मारहाणीत झाल्याचं न्यायालयात सिद्ध झालं
मुंबई उच्च न्यायालयाने एकूण 14 जणांच्या चौकशीचे आदेश स्टेट सीआयडीला दिले
मात्र राज्य शासनाने केवळ सचिन वाझे आणि इतर 3 पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीला मान्यता दिली
शासनाने केवळ 4 जणांवरच खटला चालवला
सध्या हा खटला मुंबई येथील सेशन कोर्टात सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Cabinet | सरकारमध्ये खातेबदल होण्याची शक्यता नाही, कुणीही वावड्या उठवू नये : जयंत पाटील
- सचिन वाझे प्रकरणी कारवाईची कुऱ्हाड कोणावर? पोलीस आयुक्तांवर की, गृहमंत्र्यांवर?
- महाविकासआघाडीत खलबतं! शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही बैठक
- Antilia Bomb Scare: सीसीटीव्हीत दिसलेली पीपीई किट घातलेली व्यक्ती सचिन वाझे असल्याचा NIA ला संशय
- Exclusive : ...म्हणून सचिन वाझेंना अटक, इनोव्हाच्या नंबर प्लेटचा झोल? CCTVमधून महत्वाची माहिती