(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सचिन वाझे प्रकरणी कारवाईची कुऱ्हाड कोणावर? पोलीस आयुक्तांवर की, गृहमंत्र्यांवर?
सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता सचिन वाझे प्रकरणामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा होत आहेत.
मुंबई : सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादंग उठले आहेत. अशातच सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीत भूकंपाची शक्यता आहे. राज्याच्या गृहखात्याची धुरा अनिल देशमुख यांच्याकडून काढून घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. वाझे प्रकरणात गृहखात्याची आणि सरकारची अडचण होत असल्यानं शरद पवार नाराज असल्याचं बोलंलं जात आहे. तसेच याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच देशातील सर्वात सक्षम पोलीस दल म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत, हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे. त्यामुळे आता कारवाईची कुऱ्हाड नक्की कुणावर चालणार मुंबई पोलीस आयुक्तांवर की, गृहमंत्र्यांवर, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
केवळ सचिन वाझे प्रकरण नाही, तर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीवर ज्या प्रकरणामुळे आरोप झाले, पोलीस खातं वा गृहखात्यासंदर्भातील त्या सर्व खात्यांना उत्तरं देण्यासाठी महाविकास आघाडीचे गृहमंत्री म्हणून अपयशी झाल्याचं एक चित्र उभं केलं गेलं आहे. त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री आणि शरद पवार या दोघांमध्ये ही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. यामुद्द्यवारुन विरोधकांकडून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सचिन वाझे यांच्यासह राज्यातल्या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तब्बल एक तास ही चर्चा झाली.
सचिन वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन विरोधकांकडून शिवसेनेला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. तर राष्ट्रवादीने मात्र या प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे. सुशांतसिंग प्रकरणानंतर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
सचिन वाझे प्रकरणामुळे सध्या महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र डागलं आहे. अशातच आता गृहमंत्र्यांपाठोपाठ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सचिन वाढे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्तांवरही कारवाईची कुऱ्हाड चालू शकते.
1. देशातील सर्वात सक्षम पोलीस दल म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत. हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे. ज्यामुळे मुंबई पोलिसांची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. म्हणूनच मुंबई पोलीस प्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
2. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचली?
पोलीस दलातील आजही अनेक अधिकारी या प्रकरणातून फडणवीस यांना माहिती पोहचवत असल्याची बाब समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या मृत्यूपासून ते मानसुख हिरण यांच्या पत्नीच्या जबाबापर्यंत सर्व माहिती लीक झाली. हा प्रश्न सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पडला आहे. यातही पोलीस आयुक्तांचे काहीच नियंत्रण नाही ते स्पष्ट होत आहे.
3. गृह मंत्रालय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे शरद पवार आपली प्रतिमा बिघडू देऊ इच्छित नाही. अशा परिस्थितीत तातडीने डॅमेज कंट्रोल म्हणून पोलीस आयुक्तांना हटविण्याचा विचार केला जात आहे.
4. अंबानी धमकी प्रकरणामुळे देश आणि विशेषत: महाराष्ट्राच्या गुंतवणूकीवर मोठा परिणाम होणार आहे. अंबानींच्या सुरक्षेच्या वादामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. म्हणूनच, पोलीस आयुक्तांना काढून कडक संदेश देण्याचा प्रयत्न होऊ शकेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :