(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजुरा तालुक्यात आठ ग्रामस्थांना ठार मारणारा RT1 वाघ अखेर जेरबंद, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
वाघ कृत्रिम लोखंडी पिंजऱ्यात अडकल्याचे कळताच वाघाला बेशुद्ध करणारे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पूर्ण सावधगिरी बाळगत या वाघाला पथकाने बेशुद्ध केले.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील RT1 वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. या वाघाने राजुरा तालुक्यात 8 ग्रामस्थांना ठार केले होते त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या वाघाच्या बंदोबस्तासाठी मोठी यंत्रणा कामी लागली होती. आज दुपारी मध्य रेल्वेच्या विरुर ते सिंदी या स्थानकांदरम्यान असलेल्या एका छोट्या पुलाखाली वन विभागाने तयार केलेल्या कृत्रिम सापळ्यात तो अडकला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
वाघ कृत्रिम लोखंडी पिंजऱ्यात अडकल्याचे कळताच वाघाला बेशुद्ध करणारे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पूर्ण सावधगिरी बाळगत या वाघाला पथकाने बेशुद्ध केले. यानंतर काही काळ वाट पाहून अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत वाघाला तातडीने ट्रॅक्टर वरील पिंजऱ्यात हलवण्यात आले. त्याआधी या वाघाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे आढळले आहे. वनविभागाने RT1 वाघाला सध्या नागपूरच्या गोरेवाडा येथे रवाना केले असून तेथे काही काळ त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. गेले वर्षभर RT1 वाघाच्या दहशतीमुळे या भागातील शेतीकामे आणि जंगलावर निर्भर असेलेले व्यवसाय ठप्प पडले होते. वन विभागावर RT1 वाघाला गोळ्या घालण्यासाठी दबाव वाढत होता. मात्र वनविभागाने संयमाने परिस्थिती हाताळत RT1 वाघाला जेरबंद केल्याने परिसरातील हजारो नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी यांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी जिवंत पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. वाघाला शिताफीने पकडून जेरबंद केल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. या वाघाने गेल्या काही महिन्यांत 8 जणांवर हल्ला करून त्यांना ठार मारले व 3 जणांना जखमी केले होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच वाघाला पकडण्यातही आले होते पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. आज सापळा लावून त्याला परत पकडण्यात आले.