एकत्र या, अहंकारी भाजपला मराठी माणसाची ताकद दाखवा, रोहित पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मित्रपक्षांच्याच मतदारसंघात नेत्यांची आयात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मित्रपक्षांच्याच मतदारसंघात एक एक नेता आयात करून भाजप कोणते गणित आखत आहे? असा सवाल त्यांनी केला.
Rohit Pawar on BJP : महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मित्रपक्षांच्याच मतदारसंघात एक एक नेता आयात करून भाजप कोणते गणित आखत आहे? यामुळं 2029 मध्ये सर्वांनाच भाजप विरोधात लढायचंय हे सर्वश्रुत आहे तर मग आज का नाही? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
वापरा आणि सोडून द्या ही भाजपची जुनी सवय आहे हे एव्हाना त्यांच्या मित्रपक्षांना समजलेच असेल. भाजप जे पक्षांच्या बाबतीत करते तेच नेत्यांच्या बाबतीत करत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते नवाब मलिक साहेब हे भाजपाला चालत नाहीत पण त्यांना मानणाऱ्या मतांवर निवडून आलेल्या आमदारांचा पाठींबा मात्र सरकार चालवण्यासाठी चालतो. हा भाजपाचा दांभिकपणा असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. अनेकदा सांगून देखील शिंदे साहेबांच्या पक्षातील पदाधिकारी भाजपकडून फोडले जात आहेत. मित्रपक्षांच्याच मतदारसंघात एक एक नेता आयात करून भाजप कोणते गणित आखत आहे? असा सवाल करत रोहित पवारांनी भाजपवर टीका केली. यामुळं 2029 मध्ये सर्वांनाच भाजप विरोधात लढायचं हे सर्वश्रुत आहे तर मग आज का नाही? असा सवाल देखील रोहित पवारा यांनी केला आहे.
भाजपला मराठी माणसाची खरी ताकद दाखवली पाहिजे
लोकप्रतिनिधी नाही पण एक नागरिक म्हणून मला असं वाटतं 2029 ची वाट बघण्यापेक्षा आत्ताच्या निवडणुकांमध्ये एकत्र येऊन या अहंकारी भाजपला मराठी माणसाची खरी ताकद दाखवली पाहिजे, असे मत रोहित पवारांनी व्यक्त केलं आहे.
निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच भाजपाच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं
लोकशाहीचं असं वस्त्रहरण होत असताना कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्ता मिळवून देण्याच्या मोहात अडकलेला निवडणूक आयोग मात्र ध्रुतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत बसल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. हे असंच चालायचं असेल तर निवडणुक आयोगाने निवडणुका घेण्याचा फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपाच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या विजयाच्या जल्लोषात सहभागी होऊन गुलाल अंगावर घ्यायलाही हरकत नाही. यामुळं किमान निवडणुकीसाठी खर्च होणारा सरकारी तिजोरीतील पैसा तरी वाचेल असे रोहित पवार म्हणाले.























