(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भगवान गडावर चोरी, भगवान बाबांची तलवार आणि रायफलचे सुटे भाग लंपास
अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील संत भगवान बाबा गडावर चोरी झाली आहे. भगवान गडावर असलेल्या वस्तू संग्रहालयातील एक तलवार आणि एक रायफलचे सांगाडे चोरट्यांनी लंपास केले आहेत.
अहमदनगर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत भगवान बाबा गडावर इतिहासात पहिल्यांदाच चोरी झाली आहे. भगवान गडावर असलेल्या संत भगवान बाबा वस्तू संग्रहालयात चोरट्यांनी ही चोरी केली. या वस्तू संग्रहालयात संत भगवान बाबांनी वापरलेल्या वस्तू, तलवार, रायफल यांचे जतन करण्यात आले आहे. या वस्तू संग्रहालयातील भगवान बाबांची एक तलवार आणि एका रायफलचे सांगाडे चोरट्यांनी लंपास केले आहे. विशेष म्हणजे चोरी करणारे तीन आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
दरम्यान भगवान बाबांच्या वस्तू चोरीला गेल्या असल्या तरी भगवान बाबांनी वापरलेला कोट, त्यांच्या गळ्यातील ताईत आणि ज्ञानेश्वरी या महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित असल्याचे गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितले आहे. मात्र भगवान गडावर पहिल्यांदाच अशी चोरी झाल्याने महाराजांनी खंत व्यक्त केली.
विशेष भगवान गडावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही चोरी झाल्याने आश्चर्य वक्त होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच भगवानबाबा गडावर चोरी झाल्याने पाथर्डी तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
भगवान गड - गोपीनाथ मुडेंचं शक्तिस्थळ भगवान गड खरंतर भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या गडाचं बीडच्या राजकारणावर ती कायमच प्रभाव राहिला आहे. या गडावरुन दिला गेलेला संदेश हा केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर नगर नाशिक बुलढाणा या जिल्ह्यात देखील राजकारणावर परिणाम करू शकतो असा गड म्हणजे भगवान गड. गोपीनाथ मुंडे यांचं शक्तिस्थळ असलेला भगवानगड हा कायमच राजकारणाची दिशा ठरवणारा राहिला आहे. म्हणूनच याच भगवानगडावरुन दिलेला राजकीय संदेश हा वंजारी समाजातील राजकीय निर्णया चा दिशादर्शक असायचा. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीतले जवळपास सगळे मोठे निर्णय याच भगवानगडावरुन पहिल्यांदा जाहीर केले होते.