MIM Convention: समान नागरी कायद्यासह हिंदु राष्ट्राला विरोध; एमआयएमच्या अधिवेशनात ठराव
MIM Convention: एमआयएमच्या राष्ट्रीय अधिवेशनात समान नागरी कायद्यासह हिंदु राष्ट्राला विरोध करण्याच्या ठराव यावेळी मांडण्यात आला आहे.
MIM Convention: नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय एमआयएम (MIM) पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले असून, आगामी निवडणुकीच्या लक्षात यावेळी काही ठराव मांडण्यात आले आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात समान नागरी कायद्यासह हिंदु राष्ट्राला विरोध करण्याच्या ठराव देखील यावेळी मांडण्यात आला आहे.
राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाच्यावतीने काही ठराव मांडण्यात आले. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आणि दलितांवरील हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव मांडला. तसेच मागासलेल्या मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करणारा ठरावही त्यांनी मांडला. तसेच एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी समान नागरी कायद्याला विरोध करणारा ठराव मांडला. तसेच सय्यद असीम वकार यांनी लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारा ठराव यावेळी मांडला.
तसेच एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि अतिक्रमण करणार्यांना बेदखल करण्याचे अधिकार प्रदान करण्यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करणारा ठराव मांडला. तसेच मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप बंद करण्याचा आणि अल्पसंख्याक अनुसूचित जाती-जमातींच्या शिष्यवृत्तीवर निर्बंध घालण्याचा निषेध करणारा ठरावही त्यांनी यावेळी मांडला.
चिनी घुसखोरीचा निषेध करणारा ठराव
सोबतच आदिल हसन यांनी NSA, UAPA, AFSPA आणि PSA ला आमच्या विरोधाचा पुनरुच्चार करणारा ठराव मांडला. तसेच नागरी स्वातंत्र्याचे संरक्षण आणि सर्व राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी केली. तसेच इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्ष राष्ट्रीय विस्तारासाठी आणि शोषितांच्या एकतेसाठी वचनबद्ध असल्याचा ठराव मांडला. तर मोहम्मद माजिद हुसेन यांनी चिनी घुसखोरीचा निषेध करणारा ठराव मांडला आणि लोकसभेच्या गुप्त बैठकीची मागणी केली. नरेगा, आयसीडीएस सामर्थ्य, इत्यादी महत्वाच्या योजनांच्या कमी निधीचा निषेध करणारा ठरावही त्यांनी यावेळी मांडला आहे.
राज्यातील तीन पक्षांसोबत युती करणार!
मुंबईत दोन दिवसीय एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले असून, यासाठी देशभरातील खासदार, आमदार यांच्यासह एमआयएम पक्षाचे नगरसेवक यांची उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देखील काही महत्वाचे ठराव मांडण्यात आले होते. ज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील तीन पक्षांसोबत युतीची चर्चा सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर सद्या ही चर्चा प्रथमिक स्तरावर सुरु असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ते तीन पक्ष कोणते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
एमआयएमचा 'मिशन महापालिका'; राज्यातील तीन पक्षांसोबत करणार युती, राष्ट्रीय अधिवेशनात ठराव