एमआयएमचा 'मिशन महापालिका'; राज्यातील तीन पक्षांसोबत करणार युती, राष्ट्रीय अधिवेशनात ठराव
MIM News: आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणखीन वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MIM News: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत असतानाच, आता एमआयएमकडून (MIM) देखील 'मिशन महापालिका'च्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यातील तीन पक्षांसोबत युती करण्याचा एमआयएमचा विचार असल्याचं समोर आले आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या उपस्थितीत मुंबईत होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात याबाबत ठराव मांडण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणखीन वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबईत आज आणि उद्या असे दोन दिवसीय एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडत आहे. यासाठी देशभरातील खासदार, आमदार यांच्यासह एमआयएम पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. दरम्यान आज झालेल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही महत्वाचे ठराव मांडण्यात आले आहे. ज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील तीन पक्षांसोबत युतीची चर्चा सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. यावेळी पक्षांची नावं उघड करण्यात आले नाही. सद्या ही चर्चा प्रथमिक स्तरावर सुरु असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ते तीन पक्ष कोणते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
'ते' तीन पक्ष कोणते!
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजनसोबत आघाडी करणाऱ्या एमआयएम पक्षाला मोठा यश मिळाले होते आणि महाराष्ट्रातील पहिला खासदार म्हणून इम्तियाज जलील निवडून आले होते. तसेच या दोन्ही पक्षांनी घेतेलेल्या मतदानाचा मोठा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला बसला होता. सद्या वंचित उद्धव ठाकरेंच्या सोबत गेल्याने एमआयएम एकटा आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता एमआयएम पक्षाकडून नवीन मित्रांची चाचपणी करण्यात येत आहे. परंतु ते पक्ष कोणते याबाबत अजूनही एमआयएमने उघड केले नाही.
अधिवेशनातील महत्वाचे मुद्दे...
आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने या अधिवेशनात चर्चा झाली आहे. सोबतच तसेच मुस्लीम बहुल भाग असलेले भिंवडी, मुंब्रा, औरंगाबाद यासह मुस्लीम मतदार असलेल्या भागात विशेष लक्ष देण्याबाबत यावेळी चर्चा झाली आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून जे काही धार्मिक विधाने केले जात आहे, ते लक्षात घेऊन पक्षाचा पुढील अजेंडा कसा राहणार आहे याबाबत देखील यावेळी चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याची भूमिका घेतल्याने याबाबत देखील पुढील पक्षाची दिशा ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
MIM Convention: एमआयएमचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत; असं असणार दोन दिवसीय अधिवेशन