एक्स्प्लोर
सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचं नाव द्या, लिंगायत समाजाची मागणी
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी धनगर समाजाची आहे, तर सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर नाव द्यावं असा आग्रह लिंगायत समाजाचा आहे.
सोलापूर: सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी ताजी असतानाच, आता शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ असं नामकरण करावं, अशी मागणी होत आहे. लिंगायत समाजाने ही मागणी केली असून, सोलापुरात त्यासाठी आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी धनगर समाजाची आहे, तर सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर नाव द्यावं असा आग्रह लिंगायत समाजाचा आहे.
सोलापुरात संघर्ष
विद्यापीठ नामांतराच्या मुद्द्यावरून सोलापुरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ नाव द्यावं या मागणीसाठी संघर्ष सुरु झाला आहे. संख्येने मोठ्या असलेल्या दोन समुदायाने मागणी रेटून धरल्याने, राजकीय नेतृत्वही हतबल झालं आहे. दोन्ही बाजूने रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी झाली आहे. नामांतराच्या विषयावरून सुरु झालेल्या पोस्टरबाजीने वातावरण आणखी कलुषित बनत चाललं आहे. नामांतराच्या या लढ्याला राजकीय फायदे-तोट्याची किनार असल्याने हा प्रश्न लवकर सुटेल याची तूर्त तरी शक्यता वाटत नाही.
निवडणुका नाहीत, पण वातावरण निवडणुकीसारखंच
सोलापुरात सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. पण वातावरण मात्र निवडणुकीसारख तापलं आहे. पोस्टरबाजीने सोलापुरात जणू निवडणुका लागल्याचा भास होतोय. त्याला कारण आहे सोलापूर विद्यापीठाच्या नामांतर चळवळीचं. शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ असं नामकरण करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात जाहीर मोहीम सुरु झाली आहे. सोमवारी 18 सप्टेंबरला याच मागणीसाठी विराट मोर्चा काढण्याचं ठरलं आहे.
वातावरण निर्मिती व्हावी यासाठी वाहनावर लाउडस्पीकर लावून प्रचार केला जातोय. कालपर्यंत शासन दरबारी चालू असलेली विद्यापीठ नामांतराची लढाई आता थेट रस्त्यावर येऊन पोहोचली आहे.
सोलापूरचं ग्रामदैवत
शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत. बाराव्या शतकात होऊन गेलेल्या या महापुरुषाने लोकोद्धारासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यामुळेच त्यांना दैवत्व प्राप्त झालं. सामाजिक समता, बंधुता आणि ऐक्यासाठी सिद्धारामेश्वरांनी केलेलं काम अलौकिक आहे. त्यांच्या कार्याचं स्मरण आणि प्रेरणा कायम राहावी यासाठी सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर विद्यापीठ नाव देण्याची मागणी केली जातेय. या मागणीला सिद्धेश्वर देवस्थान आणि मठ-मंदिरांनी समर्थन दिलंय.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सामाजिक क्रांती
तिकडे धनगर समाजाने विद्यापीठाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यासाठी लढा उभा केला आहे. गेल्याच महिन्यात विराट मोर्चा काढून धनगर समाजान शक्तीप्रदर्शन केलं. अहिल्यादेवी होळकर नावाला शिवसेनेसह अन्य सामाजिक संघटना आणि संस्थांनी पाठींबा दिला आहे. अहिल्यादेवींच्या सामाजिक क्रांतीची आठवण समाजमनात कायम राहण्यासाठी, विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव द्यावं असा आग्रह धनगर समाजाने केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात धनगर समाजाची मते निर्णायक आहेत. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागात लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे. सोलापूर जिल्ह्यापुरता विचार केला तर सोलापूर लोकसभा मतदार संघातील सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदार संघात लिंगायत समाजाचं निर्णायक मतदान आहे. यामुळे दोन्ही बाजूने नामांतराचा विषय आक्रमकपणे मांडला जातोय.
सोलापूर जिल्ह्यातील भाजपची वोट बँक म्हणून लिंगायत आणि धनगर समाजाकडे पाहिलं जात. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी धनगर समाजाची आहे, तर सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर नाव द्यावं असा आग्रह लिंगायत समाजाचा आहे. विद्यापीठाच्या नामांतरामुळे यापैकी एक घटक भाजपपासून दुरावण्याची शक्यता आहे. परिणामी भाजपची वोट बँक सोलापूर विद्यापीठाने धोक्यात आणल्यांच मानले जातंय. आणि याच कारणाने सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा विषय लांबणीवर टाकला जातोय.
शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement