एक्स्प्लोर
चंद्रपुरात नातेवाईकांनीच वृद्धाला भर उन्हात बांधून ठेवलं!
पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने या वृद्धाची सोडवणूक करत त्याला चंद्रपूरच्या खासगी इस्पितळात नेण्याचे ठरविले असून तो बरा झाल्यावर वृद्धाश्रमात ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

चंद्रपूर : चंद्रपुरात एका वृद्ध व्यक्तीला त्याच्या जवळच्याच नातेवाईकांनी बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातल्या महाकाली कॉलनी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. चंद्रपुरात सध्या जवळपास 45 अंश सेल्सिअस डिग्रीच्या आसपास तापमान आहे आणि अशा तापमानात वृद्धाला पाय बांधून उघड्यावर टाकल्याचं समोर आलं. चंद्रपूर सध्या सूर्यपूर झाले आहे. 45 डिग्री सेल्सियस तापमानात शहर जिल्हा होरपळत असताना शहरातील महाकाली कॉलरी जुन्या वसाहत भागात एका क्वार्टरच्या पुढे एक वृद्ध गेले काही दिवस मरणासन्न अवस्थेत पडून असलेला नागरिकांना आढळला. हे चित्र सतत नजरेस पडत असल्याने विचारपूस केल्यावर धक्कदायक गोष्ट पुढे आली. या वृद्धाचे मानसिक संतुलन बिघडले असून हा कपडे घातल्यावर काढून टाकत नग्न होऊन फिरत असल्याने त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी वृद्धांचे पाय बांधून त्याला बाहेर टाकून दिले होते. या अमानवीय प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कुटुंबाशी बोलून यातील तथ्य जाणून घेतले. दरम्यान त्याला खाण्यासाठी काहीही दिले जात नसल्याचे ही उघड झाले आहे. अखेर पोलिसांनी त्याचे बांधलेले पाय मोकळे करुन त्याची सुटका केली आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने खाऊ घातले. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात 80 वर्षाच्या या वृद्धाला अशा प्रकारे पाय बांधून ठेवण्याच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने या वृद्धाची सोडवणूक करत त्याला चंद्रपूरच्या खासगी इस्पितळात नेण्याचे ठरविले असून तो बरा झाल्यावर वृद्धाश्रमात ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आणखी वाचा























