माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरातील बंड शमले; बारलोणीत तिघेही भाऊ एकाच स्टेजवर
Madha Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वी ठिकठिकाणी पुतण्याचे काका विरुद्ध बंड दिसू लागली असताना, माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या घरातील कलह संपवत हे बंड शमवली आहे.
सोलापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी ठिकठिकाणी पुतण्याचे काका विरुद्ध बंड दिसू लागली असताना, माढ्याचे (madha) ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) यांनी आपल्या घरातील कलह संपवत हे बंड शमवली आहे. आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी पवार साहेब सांगतील ते काम करणार, अशा रीतीची भूमिका घेत आमदार शिंदे हे पुत्र प्रेमाने आंधळे झाले आहेत, असे सांगत काही दिवसापूर्वी बंड केले होते. मात्र बबनदादा यांचे धाकटे बंधू आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी आपल्या दोन्ही थोरल्या भावांना एका स्टेजवर आणत हा वाद संपल्याचे दाखवून दिले आहे. आमदार शिंदे यांच्याविरुद्ध बंड करणारे धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे हे बबन दादा व संजय मामा यांच्या स्टेजवर एकत्रित येऊन त्यांनी कौटुंबिक वाद संपल्याचे संकेत दिले आहे.
घरातील बंड शमले, विरोधकांचे मात्र धाबे दणाणले?
करमाळा विधानसभेचे आमदार संजय मामा शिंदे यांनी माढा तालुक्यातील 36 गावांचा मेळावा बारलोणी येथे बोलावलं होता. माढा तालुक्यातील या 36 गावांचा करमाळा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या मेळाव्याला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, बंधू रमेश शिंदे (धनराज शिंदे यांचे वडील) आणि आमदार संजयमामा शिंदे हे तिघेही बंधू एकाच मंचावर आल्याने हा वाद संपल्याचे स्पष्ट झाले. या मेळाव्याच्या सुरुवातीला आमदार संजय मामा शिंदे यांचा क्रेनने अडीचशे किलोचा भला मोठा हार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी गावातून रॅली काढून आमदार संजय मामा यांना स्टेजपर्यंत आणण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या फोटोला फाटा मारत केवळ शिंदे कुटुंबीयांचे फोटो बॅनर वर झळकत होते. यावेळी तीनही शिंदे बंधूंचा कार्यकर्त्यांनी एका गुलाबाच्या हारात सत्कार करीत कुटुंबाचे झालेले मनोमिलनाचे स्वागत केले. आमदार शिंदे यांच्या कुटुंबातील वाद संपल्यामुळे आता रणजीत शिंदे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे शिंदे विरोधकांचे मात्र धाबे दणाणले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या