Ratnagiri Sindhudurg Loksabha: नारायण राणे -किरण सामंतांना देवेंद्र फडणवीसांकडून तंबी; उमेदवारीचा अंतिम कौल आता दिल्ली दरबारी
Lok Sabha Election 2024 :रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीती रस्सीखेच सुरू असताना या जागेसंदर्भात अंतिम निर्णय केंद्रातून होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Ratnagiri Sindhudurg Loksabha: रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha) लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीतील शिंदे गटाचे इच्छूक उमेदवार किरण सामंत (Kiran Samant) आणि भाजपकडून नारायण राणे यांनी आक्रमकपणे या जागेवर आपल्या पक्षाचा दावा सांगितला आहे. अशातच या जागेसंदर्भात काल किरण सामंतांनी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांची भेट घेतली होती. बराचवेळ चाललेल्या या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांनी सामंतांची समजूत काढत काही काळ शांत राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर या जागे बाबतचा अंतिम निर्णय आता केंद्रातून होईल, अशी माहिती पुढे आली आहे.
अंतिम निर्णय येईपर्यंत शांत राहण्याचे आदेश
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील दोन दिवसात या जागेबद्दल अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती हाती आली आहे. तर अंतिम निर्णय होईपर्यंत नारायण राणेसह किरण सामंतांना शांत राहण्याचे सक्त आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. तर दुसरीकडे ही भेट होऊन अवघे काही तास उलटत नाही तर किरण सामंतांनी आपल्या उमेदवारीसाठी चार अर्ज विकत घेतल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागेबाबत महायुतीत मोठ्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा कायम
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले असल्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. किरण सामंत आणि उदय सामंत वारंवार या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत असतांना नारायण राणे यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गातील हा वाद नागपूर पर्यंत येऊन पोहचला आहे. याविषयी काल किरण सावंत यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
उमेदवारीचा अंतिम कौल आता अमित शाह यांच्याकडे
या भेटीदरम्यान लवकरच आपण तोडगा काढू आणि अंतिम निर्णय येईपर्यंत आपण शांत राहण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या. फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या सुमारे 45 मिनिटांच्या बैठकीत शिवसेनेच्या चिन्हावर अथवा वेळ आल्यास भाजपच्या चिन्हावर देखील निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तसेच तिकडे काहीही झालं तरी या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्याचा अट्टाहासही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवला होता. परिणामी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या होत्या.
अशातच या जागेसंदर्भात राज्यस्तरावर कुठलाही निर्णय न होता याबाबत आता अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे या बैठकीला अवघे काही तास उलटून जात नाही तोच किरण सामंतांनी आता उमेदवारी अर्ज घेतल्याने या मतदारसंघातील तिढा अधिक चर्चेत आला आहे. अशातच आता ही जागा नेमकी कुणाच्या पारड्यात जाते, हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या