Kiran Samant: फडणवीसांना भेटण्यापूर्वी शत-प्रतिशत आत्मविश्वास, पण देवगिरी बंगल्यातून बाहेर पडताच किरण सामंतांचा नूर बदलला, बोलण्यास नकार
Maharashtra Politics: फडणवीसांच्या भेटीला जाण्यापूर्वी म्हणाले, विजयाची 100 टक्के खात्री; बाहेर पडल्यानंतर किरण सामंतांची चुप्पी, देवगिरी बंगल्यावर काय घडलं? किरण सामंत यांनी बैठकीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचे म्हटले होते.
![Kiran Samant: फडणवीसांना भेटण्यापूर्वी शत-प्रतिशत आत्मविश्वास, पण देवगिरी बंगल्यातून बाहेर पडताच किरण सामंतांचा नूर बदलला, बोलण्यास नकार Devendra Fadnavis and Kiran Samant meeting in Nagpur for ratnagiri sindhudurg lok sabha constituency Kiran Samant: फडणवीसांना भेटण्यापूर्वी शत-प्रतिशत आत्मविश्वास, पण देवगिरी बंगल्यातून बाहेर पडताच किरण सामंतांचा नूर बदलला, बोलण्यास नकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/14/11ae2fdd6b4544d80e965eb1c4b6d9bc1713103197716954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिंदे गटाचे इच्छूक उमेदवार किरण सामंत (Kiran Samant) यांनी रविवारी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर जाण्यापूर्वी किरण सामंत यांनी आपण रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले होते. माझी तयारी पूर्ण झालेय, आता फक्त पेपर सोडवायचा बाकी आहे, मी 100 पैकी 100 मार्क मिळवेन, असा आत्मविश्वासपूर्ण दावा किरण सामंत यांनी केला होता. त्यामुळे फडणवीसांच्या भेटीनंतर किरण सामंत यांना खरोखरच रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उमेदवारी मिळणार का, याविषयी अनेकांना उत्सुकता होती. परंतु, फडणवीसांच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर किरण सामंत प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले.
नागपूरच्या देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंत यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर किरण सामंत हे प्रसारमाध्यमांशी बोलतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ते मीडियाशी न बोलताच निघून गेले. फडणवीसांच्या बैठकीवेळी किरण सामंत यांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी मीडियाशी बोलणे टाळले. परंतु, किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून लढण्यावर अजूनही ठाम आहेत. किरण सामंत यांनी बैठकीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत काय कौल देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नारायण राणेंचा जोरदार प्रचार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून नारायण राणे इच्छूक आहेत. मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले होते. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे. किरण सामंत आणि उदय सामंत वारंवार या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत असले तरी नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, शिंदे गटाच्या असहकार्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या अनेक बैठका रद्द करण्याची वेळ नारायण राणे यांच्यावर आली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरवल्यानंतरच हा तणाव कमी होऊ शकतो.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)