Maharashtra Politics: ठाकरेंची भेट राजकीय हेतूनं नाहीतर, शेतकऱ्यांच्या हितासाठी; राजू शेट्टींनी थेटच सांगितलं
महाविकास आघाडीत जाण्याचा विचार नाही, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टींकडून स्पष्टनिवडणूक स्वबळावरच लढणार, राजू शेट्टींची माहिती
Raju Shetti Meet Uddhav Thackeray: मुंबई : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) जाण्याचा विचार नाही, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भेटीनंतर राजू शेट्टींकडून (Raju Shetti) स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली आहे. तसेच, महाविकास आघाडीशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही, अदानींविरुद्धच्या लढाईत आम्हाला ठाकरे गटाची साथ हवी आहे, त्यामुळे आज ठाकरेंची भेट घेतली आहे, असंही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी बोलताना म्हणाले की, "आज मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मी घेतलेली भेट राजकीय हेतूसाठी नव्हती. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी भेट घेतली आहे. त्यांची अदानी उद्योगसमुहाविरोधात जी लढाई सुरू आहे, त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे. केंद्र सरकारनं अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील 5 टक्के आयातशुल्क कमी केल्यामुळे सोयाबिनला भाव नाही. 2000 साली असणारा सोयाबिनचा भाव 4 हजार रुपये, 24 वर्षांनीही आहे तसाच टिकून आहे. याचं कारण म्हणजे, कच्चं तेल जे बाहेरच्या देशातून आयात झालं, त्यावर आयात शुल्क 2025 पर्यंत 5 टक्क्यांनी कमी केल्याचे हे परिणाम आहेत."
"येत्या 15 जानेवारीपासून सोयाबिनच्या प्रश्नावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यात दौरा सुरू करणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंची अदानींविरोधातील लढाई आहे, ती शेतकऱ्यांचीही लढाई आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात वेदगंगा नदीवर पाटगावचं धरण आहे, पावणेचार टीएमसीचं त्या धरणाचं पाणी अदानी उद्योगसमुह आठ हजार चारशे कोटी खर्च करुन सिधुदुर्गाला देऊन 2100 कोटींची वीजनिर्मिती करणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सीमाभागांतील जनतेला शेतीला पाणी कमी पडणार आहे. याविरोधातही आम्ही आंदोलन सुरू करत आहोत. एक समिती आम्ही प्रकल्पाविरोधात तयार केली आहे. आम्हाला सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचीही साथ हवी आहे. त्यामुशे सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.", असं राजू शेट्टी म्हणाले.
आमचा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचार नाही : राजू शेट्टी
आमचा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही. आम्ही स्वतंत्रपणानं लढणार आहोत. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी आमचं आम्ही जाऊन, पण या लढाईत आम्हाला ठाकरे गटाची साथ हवी आहे, त्यासंदर्भात आज त्यांची भेट घेतली आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
मला महाविकास आघाडीशी देणंघेणं नाही : राजू शेट्टी
"मविआशी मला देणं घेण नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीनं कारखानदारांना पूरक भुमिका तयार केली आहे. याच मुद्द्यांवर आम्ही मविआ सोडली आहे. यावर जोवर ते स्पष्टीकरण देत नाही, तोवर आम्ही मविआसोबत जात नाही. शिवसेना अदानीविरोधात लढतंय म्हणून आम्ही त्यांचं समर्थन मागितलं आहे. जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात तेव्हा मविआचे काही नेते कारखानदारांच्या बाजूने असतात त्यामुळे आमचा मविआला विरोध आहे. आम्ही स्वतंत्रपणाने निवडणूक लढणार आहोत."